पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार, मैत्रीण बोलत नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने केला खून

| Updated on: Mar 20, 2024 | 7:49 AM

Pune Crime News: दोघांची एकच मैत्रीण होती. परंतु ती मैत्रीण बोलत नाही, म्हणून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार, मैत्रीण बोलत नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने केला खून
Follow us on

पुणे | 20 मार्च 2024 : पुणे शहरातील कोयता गँगची चर्चा अधूनमधून सुरु असते. कोयता विक्रीसाठी पुणे पोलिसांनी कडक नियमावली तयार केली आहे. त्यानंतर कोयता सरार्स मिळत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. दोन अल्पवयीन मुलांनी एका नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून केला. खुनाचे कारण धक्कादायक आहे. दोघांची एकच मैत्रीण होती. परंतु ती मैत्रीण बोलत नाही, म्हणून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे. दरम्यान १५ वर्षांच्या मुलांनाही कोयता सहज मिळत असल्याबद्दल पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून काही महिन्यांपूर्वी दर्शना पवार हिचा खून झाला होता.

कसा घडला प्रकार

पुणे शहरात सिंहगड परिसरात आनंदवन सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये प्रकाश हरिसिंग राजपूत (वय १५) परिवारासह राहतो. तो खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिकत आहे. त्याची आई सोसायटीत कामगार आहे. सोसायटीच्या कामगारांचा खोलीत हा परिवार राहतो. सोमवारी शाळेतून आल्यावर जेवण करुन तो झोपला. तो झोपेत असताना दोन अल्पवयीन मुलांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तो घरातून पळत सुटला. मात्र शंभर फुटावर कोसळला.

आरोपींनी का केला खून

प्रकाश आणि हल्लेखोर यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्यांपैकी एका मुलाशी ती मुलगी काही दिवसांपासून बोलत नव्हती. प्रकाश याच्या सांगण्यावरुन ती मुलगी बोलत नाही, असा त्यांचा समज झाला. यामुळे त्यांनी प्रकाश यालाच संपवण्याचा प्रकार केला. पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस आयुक्तांनी दिले कठोर कारवाईचे आदेश

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहनांचे तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा मोठी वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त यांनी याबाबत आता कठोर पावले उचलली आहेत.

पालकांवर जबाबदारी

अल्पवयीन मुलांकडून जर कुठला गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे काम त्यांच्या पालकांचे सुद्धा आहे. त्यामुळे जर अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर आता त्या मुलांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसचे पुण्यात कोयत्याने हल्ले रोखण्यासाठी शहरात कुठे कुठे कोयते विकल्या जातात यावर लक्ष देण्यात येणार आहे.