पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली

| Updated on: Jun 29, 2021 | 1:06 PM

पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबेहातविजचा कांचन धबधबाही कोसळत असल्याने तो नेहमीच पर्यटकांनी हाऊसफुल असतो. पावसात कांचन धबधबा पाहण्यासाठी आता तरुणाई आणि सहकुटुंब पर्यटकांची पावले जुन्नरकडे वळली आहेत.

पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली
जुन्नरच्या कांचन धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
Follow us on

जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, जुन्नर, पुणे : कोरोनासंबंधी नियम काहीसे शिथिल झाल्याने पावसात चिंब होण्यासाठी पर्यटकांची पावले जुन्नरकडे वळली आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. याचा फटका जुन्नर येथील पर्यटनालाही बसला आहे. मात्र वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून पोलिसांनी जवळपास 30 हजारांचा दंड वसूल केला आहे. (Pune Junnar Kanchan Waterfall Tourists fined)

जुन्नरच्या कांचन धबधब्यावर गर्दी

पावसाळा आला की निसर्गसंपन्न जुन्नरमध्ये पर्यटनाला बहर येतो. हिरव्यागार गालिचांच्या विस्तीर्ण पठारावर धुक्याची चादर पसरते. पावसाचे तुषार अंगावर झेलताना डोळ्यांचे पारणे फेडणारा कांचन धबधबा समोर दिसतो. सध्या जुन्नरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबेहातविजचा कांचन धबधबाही कोसळत असल्याने तो नेहमीच पर्यटकांनी हाऊसफुल असतो. पावसात कांचन धबधबा पाहण्यासाठी आता तरुणाई आणि सहकुटुंब पर्यटकांची पावले तिकडे वळली आहेत.

पर्यटकांकडून दंड वसुली

दरम्यान, कोव्हिडसंबंधी निर्बंधामुळे तिथे पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. इथे फिरायला गेलेल्या 57 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 29 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पहिलीच कारवाई असल्याने केवळ दंडात्मक तरतूद करून सोडून देण्यात आले आहे. यापुढे सरसकट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जुन्नर पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी कांचन धबधब्याला जाणाऱ्यांनो आधी गाठ पोलिसांशी पडणार आहे.

भुशी डॅमवरही गर्दी

दरम्यान, लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण परिसरात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर बंदी आहे. तरी सुद्धा नागरिक बेफिकीरपणे लोणावळा शहरात प्रवेश करत आहेत. त्याच पर्यटकांवर आता लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या :

सिंहगड, खडकवासला धरणावर जाताय? गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर दंडासह गुन्हाही दाखल

वर्षा सहलीची हौस फिटणार नाही, भुशी डॅमसह पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी

(Pune Junnar Kanchan Waterfall Tourists fined)