पुण्याच्या सणसवाडीत धक्कादायक घटना, इसमाने रागाने स्वत:चे मनगट तोडले
पुण्यातील सणसवाडीत धक्कादायक घटना घडली आहे. एका इसमाने स्वत:चे मनगट धारदार चाकूने कापून ते रस्त्यात टाकल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.

एका इसमाने स्वत:च्या हाताचा पंजा मनगटापासून धारदार चाकूने कापून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका इसमाने निदर्यीपणे स्वत:चे मनगट कापून दगडाने ठेचून तोडल्याने बघ्यांमध्ये भीतीने खळबळ उडाली आहे. पुणे येथील शिरुर तालुक्यातील सणसवाडीतील सराटेवस्तीत ही घटना घडली आहे. हा इसम मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले जात आहे. शिक्रापूर पोलिसांनी या इसमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.
सणसवाडीतील सराटेवस्तीत एक मद्यधुंद इसम कोणत्यातरी नशेमध्ये असताना त्याने हातामध्ये धारदार चाकू घेऊन स्वत:च्या शरीरावर वार करत असल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली. निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना ही माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार,पोलीस हवलदार संदीप बनकर, योगेश आव्हाड, पोलीस पाटील दत्तात्रय माने यांच्या पथकाने घटनास्थळी पाठवले.
स्वत:चा हात तोडून बाजूला फेकला
मात्र, तोपर्यंत या इसमाने स्वत:चा हात चाकूने कापून नंतर दगडाने ठेचून बाजूला फेकून दिला होता.यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे या इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी या इसमाबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.हा इसम नशेमध्ये असल्याने त्याचे नाव पत्ता समजू शकले नाहीत. त्याच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर पुढील माहिती घेऊन कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार यांनी सांगितले.
