
अवघ्या महिन्याभरापूर्वी पुण्यातील मुळशी येथे वैष्णवी हगवणे या विवहाती महिलेने हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी केलेल्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेचे प्रचंड पडसाद उमटले असून त्याप्रकरणी वैष्णवीचा पती, सासू, सासरे, नणंद आणि दीरालाही अटक केली. हे प्रकरण अद्यापही शांत झालेले नसतानाच त्याच पुण्यात आणखी असचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नणंदेच्या त्रासाला वैतागून पुण्यातील एका महिलेने तिच्या 6 वर्षांच्या मुलाला घेऊन टोकाचं पाऊल उचललं. तिने तिच्या मुलासह इमारतीच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारली. उंचावरून पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून विवाहीत महिला आणि तिच्या मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मरण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहीत असं कृत्य करण्यामागचं कारण लिहीलं होतं, ते वाचून सर्वांचेच डोळे पाणावले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कल्पक सोसायटीत हा संपूर्ण प्रकार घडला. मयुरी देशमुख असे महिलेचे नाव असून तिने तिच्या 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलासह टोकाचं पाऊल उचलून इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवलं
मुलासह इमारतीच्या टेरेसवर गेली आणि..
प्राथमिक माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटी देशमुख दाम्पत्य राहतात. बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मयुरी देशमुख ही तिच्या सहा वर्षाच्या चिमूरड्या लेकासह टेरेसवर गेली. आणि तिने तिथून खाली उडी मारली. उंचावरून पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात घेण्यात आले.
आत्महत्येआधी लिहीली होती चिठ्ठी
मात्र इमारतीवरून खाली उडी मारून आयुष्य संपवण्याआधी मयुरीने लिहिलेली चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. नणंदेच्या सतत्चा त्रासाला कंटाळून आपण ही उडी मारत असल्याचे तिने लिहीले होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मायलेकाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.