
इंदूरच्या राजा रघुवंशी प्रकरणात, पोलिसांना 99% पुरावे मिळाले आहेत जे सर्व आरोपींना शिक्षा करण्यासाठी पुरेसे आहेत. बुधवारी, पोलिसांनी या हत्येतील आरोपी प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्स आणि लोकेंद्र सिंग तोमर यांची सखोल चौकशी केल्यानंतर सोनमचा लॅपटॉप, पिस्तूल आणि 5 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जप्त केली. सध्या या प्रकरणात एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा हा या हत्येचा खरा सूत्रधार आहे. तर सोनमने या हत्येत त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. दोघांनी मिळून राजाला मारण्याचा कट रचला होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी विशाल उर्फ विक्कीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याने सोनमच्या इंदूर येथील लपण्याच्या ठिकाणी एक काळी बॅग पोहोचवली होती, ज्यामध्ये 5 लाख रुपये, दागिने, कपडे आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल होते. हे पिस्तूल हत्येच्या प्लॅन बी चा भाग होतं, तो प्लान सोनमने अतिशय धूर्तपणे तयार केला होता.
सिलोम जेम्सने केला पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
या हत्येत प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्सचा मोठा सहभाग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली आधीच अटक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिलोम फ्लॅटमधून एक काळी बॅग घेऊन गाडीत ठेवताना दिसला होता. ही बॅग हत्येशी संबंधित महत्त्वाच्या पुराव्यांचा खजिना होती, त्याचीच सिलोमने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
हिराबाग फ्लॅट होता कटासाठी अड्डा
हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सोनमच्या हिराबाग येथील लपण्याच्या जागेवर, फ्लॅटवर छापा टाकला, पण तिथून बॅग गायब होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शिलोमचं नाव समोर आलं. या फ्लॅटचा मालक लोकेंद्र सिंग तोमर हासुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. हा फ्लॅटच हत्येच्या कटाचे मुख्य केंद्र होता, जिथे हत्येची योजना आखून ती राबवण्यात आली.
मेघालय पोलिसांकडून सखोल तपास
मेघालय पोलिस हे राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सोनमला गाझियाबादमध्ये पकडण्यापूर्वी ती इंदूरमध्ये लपून बसली होती. कोणताही पुरावा सोडू नये म्हणून पोलिस आता प्रत्येक अँगलचा तपास करत आहेत. मेघालय पोलिसांच्या सक्रियतेमुळे हे प्रकरण अधिक रोचक बनले आहे. पोलिसांना जे काही पुरावे मिळाले आहेत, त्यावरून आरोपींना सहज शिक्षा होऊ शकते.