Breaking | सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

| Updated on: Mar 15, 2021 | 1:26 PM

सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. (Sachin Vaze suspended by Mumbai police)

Breaking | सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन
sachin-vaze
Follow us on

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या (NIA) कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला होता.  (Sachin Vaze suspended by Mumbai police)

सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी  संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे.

त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता. (Sachin Vaze suspended by Mumbai police)

वाझेंवर कोणते आरोप? 

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.

सचिन वाझेंच्या चौकशीवेळी NIAच्या हाती सबळ पुरावा?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर आता याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. NIA ने शनिवारी सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास कसून चौकशी केली होती. या चौकशीत NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. NIAच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Sachin Vaze suspended by Mumbai police)

संबंधित बातम्या :

मुंबई पोलिसातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल

‘एनआयए’कडून सचिन वाझेंची झाडाझडती, ठाकरे सरकार सावध; वर्षावर शरद पवार-मुख्यमंत्र्यांची भेट