जुळलेल्या लग्नात नवरदेवाकडूनच विरजण, आधी नवरीवर बंधनं घातली, नंतर सासरच्या मंडळींवर गोळीबार

| Updated on: Mar 31, 2021 | 3:05 PM

मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यात विचित्र प्रकार समोर आलाय. एका SAF जवानाने लग्न ठरल्यानंतर आपल्या होणाऱ्या सासरच्या मंडळींवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (SAF Jawan opened fire on girl family).

जुळलेल्या लग्नात नवरदेवाकडूनच विरजण, आधी नवरीवर बंधनं घातली, नंतर सासरच्या मंडळींवर गोळीबार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

भोपाळ : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय अशी घटना असते. या दिवसाची अनेक तरुण आतुरतेने वाट बघत असतात. लग्न ठरल्यानंतरपासून लग्न होण्यापर्यंतचा प्रत्येक दिवस हा नवरदेव आणि नवरीसाठी विलक्षण आणि स्वप्नवत असा असतो. मात्र, मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यात विचित्र प्रकार समोर आलाय. एका SAF जवानाने लग्न ठरल्यानंतर आपल्या होणाऱ्या सासरच्या मंडळींवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात नवरीच्या भावाचा मृत्यू झाला आहे. तर आई जखमी झाली आहे (SAF Jawan opened fire on girl family).

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील शाहपुरा पोलीस ठाणे क्षेत्रात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरु SAF जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने एका तरुणीच्या घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात तरुणीच्या भावाचं निधन झालं. तर आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या तरुणीचं जवानासोबत लग्न ठरलं होतं. मात्र, त्यांच्यात सुरु असलेल्या वादातून जवानाने तिच्या घरात गोळीबार केला.

जवानाने गोळीबार नेमका का केला?

खरंतर माथेफिरु जवान आणि तरुणीचं लग्न ठरलं होतं. त्यांचं 2 मे रोजी लग्न होणार होतं. मात्र, जवान मुलीवर हे करु नको, ते करु नको, अशा प्रकारचे बंधने घालत होता. याच मुद्द्यावरुन त्यांच्यात सतत वाद व्हायचा. याच वादातून माथेफिरु जवानाने तिच्या घरी जाऊन गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

मुलीच्या भावाचा मृत्यू, तर आई जखमी

SAF जवान हा रात्रीच्या वेळी त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने मागचा पुढचा विचार न करता थेट गोळीबार सुरु केला. या गोळीबारात मुलीच्या भावाच्या पोटाला गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याशिवाय मुलीच्या आईलाही गोळी लागली. मुलीची आई गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

शेजारचे आल्याने अनेकांचे प्राण वाचले

माथेफिरु जवानाने गोळीबार सुरु केल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी घरात आले. त्यांनी मोठ्या शिताफीने जवानाच्या हातातून रिव्हाल्वर हिसकावली. नाहीतर घरातील आणखी काही लोकांना गोळी लागली असती.

पोलिसात गुन्हा दाखल

संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला जवानाच्या विरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, तरुणाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कलम 302 अंतर्गतही गुन्हा दाखल केला. ड्यूटी संपल्यानंतर SAF जवानाने त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा करणं गरजेचं होतं. मात्र, तसं का झालं नाही? याचाही तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : गुन्हा वेगळाच, घाबरलेल्या आरोपीने पुण्याच्या बर्थडे पार्टीतील गँगरेपची कहाणी घडाघडा सांगितली…