जेसीबी चोर कसा बनला अघोरी बाबा… गावकऱ्यांनी कुंडलीच काढली; जादूटोण्याच्या त्या प्रकाराने अख्खं सोलापूर हादरलं

Solapur Aghori Baba : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणात अघोरी बाबाकडे गावकरी बोट दाखवत असल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?

जेसीबी चोर कसा बनला अघोरी बाबा... गावकऱ्यांनी कुंडलीच काढली; जादूटोण्याच्या त्या प्रकाराने अख्खं सोलापूर हादरलं
अघोरी बाबाविरोधात गावकरी आक्रमक
| Edited By: | Updated on: Jul 23, 2025 | 1:01 PM

सोलापूर जिल्ह्यातील कार्तिक खडाळे शाळकरी मुलगा हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. हा खून जादूटोण्याच्या प्रकरणातून केल्याचा दावा गावकरी करत आहेत. माढा तालुक्यातील संत सावता महाराज यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या अरण या गावच्या अघोरी बाबाला अटक करावी आणि त्याची चौकशी करावी. त्याच्यावर जादुटोणा विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा यासाठी गावकरी आक्रमक झाले आहेत.

कार्तिकच्या हत्येने संताप

सोलापूर च्या माढा तालुक्यातील अरण मध्ये कार्तिक खडाळे या १० वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण आणी त्यानंतर त्याची हत्या हे प्रकरण समोर आल्यानंतर श्री संत सावता महाराजांची पावन भूमी असलेल्या अरण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. अघोरी बाबाच्या मठाला ग्रामपंचायतीची परवानगी नाही. सोशल मीडियामुळे बाबा लोकप्रिय झाला आहे. त्याला अटक झाली नाही तर 25 तारखेला सोलापूर पुणे महामार्गावर गावकरी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

हत्येमागे अघोरी बाबाच?

१५ जुलैला अपहरण झाल्यानंतर कार्तिक चा मृतदेहच १९ जुलैला आढळून आला.टेभुर्णी पोलिसांनी सिसिटिव्हीच्या आधारे कार्तिकच्या चुलत भाऊ असलेल्या संदेश खडाळे ला अटक करुन खुनाचा गुन्हा दाखल केला. खरा मात्र या तपासावरच सरपंचासह गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

कार्तिकचे हत्या प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले गेले असून कार्तिकचा मृतदेह “अघोरी बाबा “च्या मठाजवळ आढळल्याने अघोरी बाबाचा या हत्या प्रकरणात हात असल्याचा तसेच संदेशने पोस्टमनचे काम केले आहे.याच्या मागे अघोरी बाबा असल्याचा मोठा आक्षेप आणी गंभीर आरोप गावचे सरपंच दिपक ताकतोडे यांच्यासह गावकऱ्यांनी केला आहे.

जेसीबी चोर ते अघोरी बाबा

राहुल रामचंद्र शिंदे उर्फ -राहुल दादा अघोरी बाबा असे त्याचे नाव आहे. पोलिस तपासाविषयीच गावकऱ्यांनी अनेक सवाल उपस्थित करताना आमच्या गावाला सावता महाराजाचे अरण अशी ओळख असताना -अघोरी बाबाच्या नावाने अशी चुकीची ओळख निर्माण होत असल्याची खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली. बाबाकडे एक काळी फारच्युनर -एक xuv गाडी असल्याचे सांगताना मोडनिंब पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचाऱ्यांनी बाबाचे दर्शन घेतलेला फोटो देखील दाखवुन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी या खून प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

राहुल मुनी महाराज (राहुल दादा अघोरी) हे मुळचे अरण गावचे रहिवाशी आहेत. राहुल यांचा पुर्व इतिहास सांगताना गावकरी म्हणाले की गावातील सुरेश पाटील यांचा जेसीबी चोरीच्या प्रकरणात राहुल याचा हात होता. मात्र माफी मागितल्यानंतर सोडण्यात आले होते. त्यानंतर तो गाव सोडून गेला. परत आला तो अघोरी बाबा म्हणूनच. गेल्या एक ते दीड वर्षापासून त्याचा अरण तुळशी रोडलगत मठ असल्याचे सरपंच दिपक ताकतोडे यांनी सांगीतले.

सोशल मीडियामुळे बाबा फेमस

अरणची महाकाली या नावाने बाबाचे इन्सटावर पेज असून ५८ हजार ७०० फॉलोअर्स महाराजांनी जोडले आहेत. महाराज फेमस झालेत.अनेक जण बाबाला शोधत अरणला पोहचत आहेत.सुख शांती-वैवाहीक-अपत्य-आजार विविध समस्यांशी निगडित व्हिडीओ हे महाराज टाकत आहेत .मागील दोन महिन्यापूर्वी या बाबाच्या मठातील महाकाल च्या मुर्तीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी झालेली असल्याचा video पेजवर टाकण्यात आलाय. ७४९ व्हिडियो पेजवर टाकण्यात आलेत.

अघोरी बाबाचं खूनाचा मास्टरमाईंड

अघोरी बाबाच या मुलाच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईन्ड असून त्याला अटक करुन चौकशी करण्यात यावी तसेच जादु टोणा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरपंच दीपक ताकतोडे यांनी केली. हा अघोरी बाबा वगैरै कोणी नसून तो भोंदु गिरी करत असून तो जेसीबी चोर आहे.त्याने गावातील पाटील नावाच्या व्यक्तिचा जेसीबी चोरला होता.त्यानंतर माफी मागितल्यानंतर गुन्हा दाखल न करता त्याला सोडण्यात आले होते.तेव्हा गावातून गेल्यानंतर तो माघारी “अघोरी बाबा ” बनूनच आला, अशी माहिती त्यांनी दिली.

दोषी आढळल्यास बाबाला अटक

हा गुन्हा गंभीर असून या हत्या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू आहे.संदेश खडाळे याच्यासह अन्य कोणते आरोपी होते का ? याचा आम्ही सखोल तपास करीत आहोत. कुणाचीही गय केली जाणार नाही.दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करुन अटक करु, असे डीवायएसपी अजित पाटील यांनी माहिती दिली. अघोरी बाबा विषयी आणी पोलिस कर्मचार्याने दर्शन घेतल्याच्या प्रश्नावरुन विचारणा केली असता बोलने टाळले.

बाबा मठातून गायब

केलेल्या आरोपावर बाबाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बाबाचा मठ tv9 ने गाठला.बाबा मात्र मठातुन गायब झाल्याचे पहायला मिळाले.बाबाच्या वडिलांनी गावकऱ्यांनी केलेले आरोप फेटाळत आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.