गल्लीतला दादा ते कुख्यात डॉन, सोलापूर पोलीस आयुक्तांकडून गुंडांची यादी, ‘चुन चुन के’ कारवाई

| Updated on: Mar 05, 2021 | 11:41 AM

गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे (Solapur Police Commissioner Goons Gangster)

गल्लीतला दादा ते कुख्यात डॉन, सोलापूर पोलीस आयुक्तांकडून गुंडांची यादी, चुन चुन के कारवाई
सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे
Follow us on

सोलापूर : सोलापूर शहरातील सात पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुंडांवर आता ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई होणार आहे. गुंडांची यादी पोलिसांकडून तयार करण्यात आली असून त्यावर लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार, असा इशारा सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठीशी’ बोलताना दिला. (Solapur Police Commissioner Ankush Shinde warns action against Goons Gangster)

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून अनेक वेळा धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यांनी आता शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची यादी काढण्याच्या सूचना केल्या होत्या.

गुन्हेगारी टोळ्या आणि म्होरक्यांवर मोक्का लावणार

पोलीस स्टेशननुसार यादी पोलीस आयुक्तांकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे सोलापूरकरांनी स्वागत केलं आहे. तर कारवाईच्या भीतीने समाजात शांतता बिघडवणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पदभार स्वीकारणाऱ्या पूर्वी सोलापूर शहर हे जणू गावगुंडाचे शहर आणि अवैध धंद्याचे आगार आहे की काय, अशी परिस्थिती होती. मात्र अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई तर झालीच आहे, शिवाय अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही अंकुश शिंदे यांनी थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

गल्लीबोळातील दादा-भाईही धास्तावले

कायदा सगळ्यांसाठी समान असतो, हे अंकुश शिंदे यांनी सोलापूरकरांना त्यांच्या कृतीतून दाखवलं आहे. आता तर पोलीस आयुक्तांनी चक्क शहरातील गल्ली बोळात दादागिरी करणाऱ्या गुंडांचीही नावं पोलिसांना काढायला सांगितली आहेत. त्यानुसार पोलिसांकडून यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गल्लीबोळात दादागिरी करत कायदा हातात घेणाऱ्या गुंडांमध्येही चांगलीच दहशत बसली आहे.

गाव आणि गावाच्या नाना तऱ्हा. सोलापूरही त्यात कसं मागे राहणार… इथली चळवळ, कामगार संघटना याशिवाय धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध शहर. गुन्हेगारी विश्व ,अवैध धंदे आणि राजकारणाच्या कुरापतीतून होणाऱ्या वादासाठी तितकंच कुप्रसिद्ध. मात्र एखाद्याने मनावर घेतलं तर अशा कुप्रसिद्ध गोष्टींवर आळा तर बसतोच, शिवाय गुन्हेगारी वृत्तीचे लोकही सुतासारखे सरळ होतात आणि आता शहरातही तसंच होतंय. (Solapur Police Commissioner Ankush Shinde warns action against Goons Gangster)

खासगी सावकारांवरही अंकुश

राज्यात केवळ कागदावर अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंलबजावणी करत अनेक गरीब लोकांची सावकारी पाशातून मुक्तता केली आहे. सोलापूर शहरात कायद्याची पायमल्ली करत बिनधास्तपणे खासगी सावकार आपले व्यवसाय करत होते. कुणी दहा टक्क्यावर, तर कुणी चाळीस टक्क्यावर गोरगरीब आणि गरजू लोकांना व्याजाने पैसे देत असत. आणि त्यांची एकप्रकारे शहरात वर्षानुवर्षे पिळवणूक सुरुच होती. मात्र यावर कडक कारवाई करण्यास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सुरुवात केली आहे. म्हणूनच काही शहरातील 50 हून अधिक खासगी सावकार गजाआड करण्यात आले आहेत ,यात काही नगरसेवक आणि समाजसेवेचा आव आणणाऱ्या खासगी सावकारांचा समावेश आहे. शिवाय गोरगरिबांच्या जागा हडपणाऱ्या लोकांची थेट तुरुंगात रवानगी केली आहे.

‘लीडर हो तो ऐसा’

गुन्हेगारांवर वचक बसवत असताना आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे प्रश्न आणि अडचणी तत्परतेने सोडवले जातात. त्यांच्या अडचणी सोडवून त्याचा निपटारा करतात. त्यामुळे पोलीस कर्मचारीही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना साथ देतात आणि ‘लीडर हो तो ऐसा’ असं खासगीत बोलतात. मात्र असं असताना सुद्धा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असणारे अंकुश शिंदे यांनी आपण वेगळं काही करत नसल्याचं सांगत खाकीशी इमान राखतो असं ते सांगतात.

संबंधित बातम्या :

गजा मारणेच्या नऊ साथीदारांना बेड्या, हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

(Solapur Police Commissioner Ankush Shinde warns action against Goons Gangster)