Breaking : मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन-तीन जण छतावर चढले; खाली उतरवण्यात यश

| Updated on: Aug 23, 2022 | 7:06 PM

आज एकाने मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन जण मंत्रालयाच्या छतावर चढले होते. त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न होता. मात्र, पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुपपणे खाली उतरवलं आहे.

Breaking : मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन-तीन जण छतावर चढले; खाली उतरवण्यात यश
Follow us on

मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. अशावेळी आज एकाने मंत्रालयाच्या (Mantralaya) छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन जण मंत्रालयाच्या छतावर चढले होते. त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न होता. मात्र, पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुपपणे खाली उतरवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सदनात प्रश्न विचारला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ते तीन जण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या छतावर चढले होते. आता त्यांना खाली उतरवण्यात आलं असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.

आमदार निलेश लंकेंनी तरुणांची समजूत घातली

दरम्यान, आमदार निलेश लंके आणि एका मराठा समन्वयकाने दिलेल्या माहितीनुसार विविध विभागातील भरती प्रक्रियेत सहभागी झालेले काही विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मागण्यासाठी मंत्रालयात चकरा मारत आहेत. आज त्यांना अधिकाऱ्यांनी चुकीची वागणूक दिल्यानं त्यांचा संताप अनावर झाला आणि ते मंत्रालयाच्या छतावर चढले. शेवटी त्यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवण्यात आलं. पण मुलांना चुकीच्या पद्धतीने, जातीवादी दृष्टीकोनातून वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता मराठा समन्वयक करत आहेत.

‘मुलांचा जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरले, आता सरकारनं लक्ष द्यावं’

निलेश लंके म्हणाले की, मंत्रालयातील आमचे काम उरकून खाली येत असताना आम्हाला समजलं की काही युवक छतावर गेले आहेत. तेव्हा मी स्वत: आणि काही पोलीस पळत वर गेलो. आम्ही शेवटच्या मजल्यावर गेल्यानंतर त्या युवकांना आवाज दिला. त्यांना विचारलं की बाबांनो हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय? त्यावर ती मुलं म्हणाली की तुम्ही दोन पावलं जरी पुढे आलात तर आम्ही उडी घेऊ. त्या मुलांना मी निलेश लंके असल्याचं सांगितलं. तेव्हा ते केवळ माझ्याशी बोलायला तयार झाले. त्यांच्याशी बोललो, त्यांची समजूत घातली. हा सगळा प्रकार अर्धा ते पाऊण तास सुरु होता. त्या मुलांना मी विश्वास दिला. त्यांचा जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. पण सरकारने या मुलांच्या रास्त मागणीकडे लक्ष द्यावं, त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निलेश लंके यांनी केलीय.