Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरण, आरोपीच्या डीपीवर आमदाराचा फोटो, धक्कादायक माहिती समोर

Pune Bus Rape Case : सध्या सगळ्या राज्याला पुणे बलात्कार प्रकरणाने हादरवून सोडलं आहे. शिवशाही बसमध्ये अत्याचाराची ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे बद्दल धक्कादायक माहिती समोर आलीय. त्याचे काही राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता आहे.

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरण, आरोपीच्या डीपीवर आमदाराचा फोटो, धक्कादायक माहिती समोर
Pune Rape Accused
| Updated on: Feb 27, 2025 | 12:57 PM

पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. आरोपी दत्तात्रय गाडेचे काही राजकीय कनेक्शन सुद्धा समोर आले आहेत. शिरुरचे माजी आमदार अशोक पवार यांचा एक बॅनर लागला आहे. त्या राजकीय बॅनरवर आरोपी दत्तात्रय गाडेचा फोटो आहे. त्याशिवाय दत्तात्रय गाडेच्या व्हॉट्स App डीपीवर आमदार माऊली कटकेचा फोटो आहे. आरोपी दत्तात्रय गाडे गावात आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता म्हणून फिरत असायचा अशी सुद्धा माहिती आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात आला होता. त्याने घरी विश्रांती घेऊन त्याने गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपीवर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत. आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 13 टीम्स तयार केल्या आहेत. आरोपीच गुन्हेगारीशी जुनं नातं आहे. तो हिस्ट्रीशीटर आहे. आरोपी दत्तात्रय गाडे जामिनावर बाहेर आला होता. त्यावेळी त्याने हा दुसरा गुन्हा केला. दत्तात्रय गाडे 2019 जामिनावर बाहेर आला होता. आरोपी दत्तात्रय गाडेवर पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांच इनाम

पुणे पोलिसांना अजूनही आरोपीला पकडता आलेलं नाही. म्हणून पुणे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्या 1 लाख रुपयांच इनाम जाहीर केलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आणि तरुणीने दिलेल्या माहितीवरुन आरोपीची ओळख पटवली.

आरोपी दत्तात्रय गाडेविरोधात कुठले गुन्हे?

स्वारगेट पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय दत्तात्रय रामदास गाडेवर पुणे आणि आसपासच्या परिसरात चोरी, दरोडेखोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. 2024 साली दत्तात्रय गाडे विरोधात पुण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्याच्या चौकशीसाठी त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं.

माऊली कटके कुठल्या पक्षाचे आमदार?

माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या गटाच्या अशोक पवार यांना पराभूत करुन निवडणूक जिंकली होती.