ठाणे पोलिसांची विशेष मोहिम, ‘टार्गेट मोबाईल हँडसेट’द्वारे सव्वा कोटीचे मोबाईल हस्तगत

| Updated on: May 13, 2023 | 12:41 AM

मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे ठाणे पोलिसांनी एक विशेष मोहिम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठाणे पोलिसांची विशेष मोहिम, टार्गेट मोबाईल हँडसेटद्वारे सव्वा कोटीचे मोबाईल हस्तगत
ठाणे पोलिसांनी 711 मोबाईल मूळ मालकांना परत केले
Image Credit source: Google
Follow us on

ठाणे : उन्हाळी सुट्टीत अनेक कुटुंबे आपल्या मूळ गावी गेल्यामुळे चोरट्यांना डोके वर काढले आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही चोऱ्या-घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई आणि ठाणे शहरात तर मोबाईल चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. अशा भुरट्या चोरट्यांना रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरांचा पर्दाफाश करत त्यांच्याकडील चोरीचे मोबाईल जप्त केले. नंतर मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेत त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले आहेत. अनेक लोक बस स्थानक, रेल्वे स्थानक यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी आपले मोबाईल हरवून बसले होते. त्या लोकांचाही शोध घेण्यात ठाणे पोलिसांनी यश मिळवले. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी तब्बल एक कोटी 28 लाख रुपये किंमतीचे 711 मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द केले.

विशेष मोहिम राबवत चोरट्यांचा पर्दाफाश

पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश केल्याबद्दल ठाणे पोलिसांच्या विशेष कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. ठाणे पोलिसांनी चोरी तसेच सार्वजनिक ठिकाणांहून हस्तगत केलेल्या मोबाईलमध्ये विविध प्रकारच्या महागड्या हँडसेटचा समावेश आहे. 25 अॅप्पल आयफोन्स, 35 वन प्लस, 152 विवो, 136 ओप्पो, 136 एमआय, 107 सॅमसंग आणि अन्य 120 हँडसेट अशा प्रकारे अनेक महागड्या हँडसेटचा थांगपत्ता लावून तो मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

अशी केली शोध मोहिम फत्ते

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या झोन-1 ने विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली होती. या विशेष पोलीस पथकाला टार्गेट मोबाईल हँडसेट असे नाव देण्यात आले होते. या पोलीस पथकाने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा आधार घेऊन मोबाईल शोध मोहीम फत्ते केली. या पोर्टलवर मोबाईलचा मूळ मालकाची वैयक्तिक माहिती नोंदविण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने चोरीला गेलेल्या मोबाईलवर पाळत ठेवली होती. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केल्यामुळे चोरीला गेलेले मोबाईल फोन मिळवण्यात यश आल्याचे ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

हे सुद्धा वाचा