माता न तू वैरिणी ! जन्मतःच चिमुरडी आजारी पडली, आईने जे केले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली

अहमदाबादमधील सिव्हील रुग्णालयात उपचार घेत असलेली तीन महिन्यांची चिमुरडी अचानक गायब झाली. चिमुरडीचा शोध घेण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व प्रकार उघडकीस आला.

माता न तू वैरिणी ! जन्मतःच चिमुरडी आजारी पडली, आईने जे केले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली
नवजात बालिकेला मातेने कचऱ्यात फेकले
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 02, 2023 | 9:49 PM

अहमदाबाद : गुजरातमधील एका रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदाबादमधील सिव्हील रुग्णालयात उपचार घेत असलेली तीन महिन्यांची चिमुरडी अचानक गायब झाली. चिमुरडीचा शोध घेण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व प्रकार उघडकीस आला. आईनेच स्वतःच्या मुलीला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली आहे. मुलगी जन्मापासून आजारी असते, तिचा त्रास पाहवत नव्हता. म्हणून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे महिलेने सांगतिले

जन्मतःच मुलगी आजारी पडली

आनंद जिल्ह्यातील पेटलाड तालुक्यातील रहिवासी फरजानबानू मलिक या महिलेची तीन महिन्यांपूर्वी प्रसुती झाली होती. जन्मतःच मुलगी आजारी झाल्याने तिच्यावर वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

दूषित पाण्यामुळे मुलगी आजारी पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतर पुन्हा मुलीची तब्येत बिघडल्याने तिला 14 डिसेंबर रोजी नाडियाड येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले.

मुलगी गायब झाल्याचा कांगावा केला मात्र…

महिलेने सोमवारी आपली मुलगी रुग्णालयातून गायब झाल्याचा कांगावा केला. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी जेव्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे घटना उघडकीस

सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला आपल्या मुलीला घेऊन गॅलरीच्या दिशेने जाताना दिसली. मात्र परत आली तेव्हा तिच्या हातात मुलगी नव्हती. मुलीचा मृतदेह जमिनीवर पडलेला कर्मचाऱ्यांना आढळला. यानंतर महिलेची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.

जन्मापासून मुलगी आजारी आहे. तिच्या वेदना पाहवत नसल्याने आपण तिला हे कृत्य केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील कारवाई पोलीस करत आहेत.