
सुरत शहरातील लसकाणा विभागात एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. येथील विपुलनगर सोसायटीत एका कचऱ्याच्या ढीगाऱ्यात वक्तीचे कापलेले शीर सापडले आहे. परंतू हे शीर कोणाचे होते? हे निर्घृण खून कोणी केला ? या विषयी उलट सुलट चर्चा सुरु झाली. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा समजले की शीर जेथे सापडले होते त्यापासून २०० मीटर दूर विपुलनगर सोसायटीच्या एका घराच्या पहिल्या माल्यावर खोली क्रमांक – १३ मधून दुर्गंधी येत होती.
हे घर अनेक वर्षांपासून बंद पडले होते. याचा टाळाही गंजलेला होता. पोलिसांनी टाळा तोडून रुममध्ये प्रवेश केला तर तेथील नजारा भयानक होता. खोलीत एका व्यक्तीचे शीर नसलेले धड पडले होते. कोणी तरी हत्या करुन मृतदेहाचे दोन तुकडे केले होते. आणि शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते.
पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता ज्याची हत्या अशा क्रूर पद्धतीने झाली तो नेमका कोण आहे. सुरत पोलिसांनी संपूर्ण ताकद लावून या घटनेचा तपास सुरु केला. क्राईम ब्रांच आणि लसकाणा पोलिसांनी मिळून सात पथके स्थापन केली गुप्त बातमीदारांच्या आधारे पुन्हा जोमाने तपास सुरु केला. या रुममध्ये पोलिसांना एक डायरी सापडली. त्यावरुन काही धागेदोरे सापडतात याचा धांडोळा पोलिसांनी सुरु केला.
या डायरीत एक बँक क्रमांक लिहिला होता. पोलिसांना वाटले की मयत इसमाचे खाते असेल. परंतू जेव्हा खाते तपासले तर हे खाते ओडीशातील कोणा व्यक्तीचे होते. सुरत पोलिसांनी ओडीशा पोलिसांशी तातडीने संपर्क केला. त्यानंतर हैराण करणारी बातमी कळाली. जो व्यक्ती ज्याचे हे खाते होते तो दीड महिन्यांपूर्वीच ओडीशाला परतला होता आणि तो जीवंत होता. मग ही डायरी येथे कशी पोहचली. ? ज्याचा खून झाला तो नेमका कोण?
सूरतचे डीसीपी आलोक कुमार यांनी सांगितले की मयत इसमाची ओळख अजूनही पटलेली नाही. आजबाजूच्या लोकांकडे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. डायमंड इंडस्ट्री पार्कच्या जवळील सीसीटीव्हींचा तपास केला जात आहे. या परिसर औद्योगिक घडामोडींचा परिसर आहे. येथे मजूरांची नेहमीच येजा सुरु असते. परंतू या रहस्यमयी हत्येने सर्वांना हैराण केले आहे. पोलीसांच्या टीम दिवसरात्र तपास करत आहेत. परंतू ही गुंतागुंत काही संपलेली नाही.