हा माज कसला? जळगावात मद्यधुंद तरुणांचा हैदोस, अनेक नागरीक जखमी

| Updated on: Feb 07, 2024 | 8:45 PM

जळगाव शहरात मद्यधुंद तरुणांनी प्रचंड हैदोस घातला. त्यांनी 17 ते 18 नागरिकांना लाकडी दंडुक्याने मारहाण केली. या मारहाणीत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी आता काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हा माज कसला? जळगावात मद्यधुंद तरुणांचा हैदोस, अनेक नागरीक जखमी
Follow us on

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 7 फेब्रुवारी 2024 : जळगावच्या चाळीसगावमध्ये एका माजी नगरसेवकावर भर दिवसा गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आता जळगाव शहरातील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. जळगावात दोन मद्यपी दुचाकीस्वारांच्या गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही हाणामारी आरोपींच्या पुरता मर्यादीत राहिली नाही. कारण या दोन्ही गटाच्या आरोपींनी तिथे उपस्थित असलेल्या परिसरातील नागरिकांनादेखील लाकडी दांडक्याने मारहाण केली. संबंधित घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींकडून हॉटेलच्या बाहेर असलेल्या झाडांच्या कुंड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. आरोपींच्या गटांकडून परिसरातील हॉटेल मालकासह 17 ते 18 नागरिकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे जळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नैवेद्य हॉटेल बाहेर दोन मद्यधुंद तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. तरीदेखील हा वाद मिटला नाही. दोन्ही तरुणांनी आपापल्याकडच्या तरुणांना बोलावून घेतलं. दोन्ही गटाच्या टवाळखोरांनी या परिसरात नैवेद्या हॉटेलबाहेर प्रचंड तोडफोड केली. यावेळी त्यांनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या तब्बल 17 ते 18 नागरिकांना मारहाण केली.

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आणि…

आरोपी टवाळखोरांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकासह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी भीतीने नागरिकांची प्रचंड पळापळ झाली. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी यावेळी घटनास्थळी जमलेली गर्दी पांगवली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तरुणांचा मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

आरोपींनी अशाप्रकारचं कृत्य करणं अशोभणीय आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या तरुणांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी योग्य ते पाऊल उचलणं जास्त जरुरीचं आहे. पोलिसांनी आरोपी तरुणांना पकडून कोर्टात हजर करावं आणि कोर्टाने त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.