मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना चिरडले, दोन महिलांचा जागीच मृत्यू

अनिता शिंदे आणि अर्चना सन्मत या दोघी आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. मॉर्निंग वॉक करत असताना जंक्शन येथील वालचंदनगर पोलीस ठाण्यासमोर या दोघींनाही अज्ञात वाहनाने धडक दिली.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना चिरडले, दोन महिलांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये वाहनाच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 22, 2023 | 1:59 PM

इंदापूर / नाविद पठाण (प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिता शिवाजी शिंदे आणि अर्चना श्रीशैल्य सन्मत अशी अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर जंक्शन गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. सध्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाचा वेग आला असून, या कामामुळेच वाहनांची वर्दळ असते. यातूनच हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या महिला

अनिता शिंदे आणि अर्चना सन्मत या दोघी आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. मॉर्निंग वॉक करत असताना जंक्शन येथील वालचंदनगर पोलीस ठाण्यासमोर या दोघींनाही अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यात दोघींचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जंक्शन गावावर शोककळा पसरली असून, गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु

इंदापूर तालुक्यात सध्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरु आहे. ठिकठिकाणी या महामार्गाचे काम सुरु आहे. यामुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. दुसरीकडे वालचंदनगर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून, या रस्त्यावरुन गेलेल्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

दोन दिवसात तिघांचा अपघातात मृत्यू

मागील काही दिवसात या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच याच परिसरात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता दोन महिलांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.