
एखादा गुन्हा केल्यानंतर तो लपवण्यासाठी लोक अनेक क्लृपत्या करतात. शहर सोडतात. राज्य सोडतात. इतकंच काय साधूचा वेष धारण करून लपत फिरतात. पण कधी ना कधी या लोकांना अटक होतेच होते. केलेला गुन्हा आज ना उद्या उघड होतोच. आरोपी पकडला जातो. थोडा उशीर होतो पण पकडला जातो. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या अँटी रॉबरी आणि स्नॅचिंग सेलने एका आरोपीला तब्बल 34 वर्षानंतर अटक केली. विशेष म्हणजे या आरोपीने नाव बदललं, शहर बदललं, वेगळी भाषाही शिकला, इतकंच काय त्याने बापही बदलला. पण सर्व क्लुप्त्या फेल ठरल्या. पोलिसांनी अखेर त्याला पकडलं आणि तुरुंगात डांबलं.
योगेंद्र उर्फ जोगिंदर सिंग असं या आरोपीचं नाव आहे. 34 वर्षापूर्वी त्याने बायकोचा गळा दाबून खून केला होता. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी नाना गोष्टी केल्या होत्या. पण अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे कानून के हाथ लंबे होते है… या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
काय घडलं?
15 मार्च 1992 रोजी दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या पिल्लंगी गावातील ही घटना आहे. आता हे गाव सरोजिनी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. सकाळी सव्वा सातच्या सुमाराला पोलिसांना एक कॉल आला. एका व्यक्तीने त्याच्या बायकोचा गळा दाबून हत्या केली. आता तो पळून जाण्याच्या तयारीत आहे. घर मालकाच्या भावाच्या मदतीने पोलिसांनी योगेंद्रचा पाठलाग केला आणि त्याला अटक केली. घरात योगेंद्रच्या बायकोचा मृतदेह पडलेला होता. तिच्या डाव्या डोळ्याजवळ जखमा होत्या. पोस्टमार्टम रिपोर्ट आला. त्यात हातांनी गळा दाबल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपपत्र दाखल केलं. 1997मध्ये पटियाला हाऊस कोर्टाने योगेंद्रला पत्नीच्या खुनात दोषी धरलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच त्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
पॅरोलवर आला आणि पळाला
शिक्षा भोगत असताना 2000मध्ये योगेंद्रने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केली आणि त्याला चार आठवड्याची पॅरोल मिळाली. पण तुरुंगातून बाहेर आल्यावर पळून जाण्याचा योगेंद्रच्या मनात विचार आला. पॅरोल संपल्यानंतर तो तुरुंगात परत आला नाही. तो भूमिगत झाला. 2010मध्ये हायकोर्टाने त्याची अपील रद्द केली. तसेच त्याची शिक्षा कायम ठेवली. पण योगेंद्र कुठेही सापडत नव्हता. कोर्टाने त्याला फरार घोषित केलं आणि त्याला शोधण्याचं काम क्राईम ब्रँचच्या टास्क फोर्सवर सोपवलं.
नाव बदललं, भाषा बदलली
फरार झाल्यानंतर योगेंद्र देशाच्या वेगवेगळ्या भागात राहिला. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि कर्नाटकात राहिला. प्रत्येक राज्यात तो दोन ते तीन वर्ष राहायचा आणि नंतर आपलं वास्तव्य बदलायचा. 2012मध्ये तो पंजाबच्या लुधियांनात राहायला आला. या ठिकाणी त्याने मोठं षडयंत्र रचलं. त्याने आपलं नाव योगेंद्र बदलून जोगिंदर सिंग ठेवलं. वडिलांचं नाव जय प्रकाश ऐवजी जयपाल ठेवलं. वडिलांचं नाव बदलून घेतल्यावर त्याने नवीन आधारकार्ड बनवलं. लुधियानाच्या पत्त्यावर आधार कार्ड आणि व्होटर कार्डही बनवलं. पंजाबी वाटण्यासाठी त्याने पंजाबी भाषा शिकून घेतली. आता तो अस्खलित पंजाबी बोलतो. तिथे त्याने कारपेंटरचं काम केलं. कुणाला संशय येणार नाही याची खबरदारी घेतली.
500 लोकांची चौकशी…
क्राईम ब्रँचचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक मंगेश त्यागी आणि रॉबिन त्यागी यांची टीम योगेंद्रला शोधत होते. हेड कॉन्स्टेबल मिंटू यादव यांना योगेंद्र लुधियानात लपलेला असू शकतो, अशी गुप्त सूचना मिळाली. पोलिसांनी मुजफ्फरनगर आणि लुधियानातील सुमारे 500 लोकांची प्रोफाईल चेक केली. त्यांचे रेकॉर्ड खंगाळून काढले. जेव्हा जोंगिदरच योगेंद्र असल्याची खात्री पटली तेव्हा पोलिसांची एक टीम लुधियानात गेली. त्या ठिकाणी पोलिसांची टीम 10 दिवस वेशांतर करून राहिली. त्यानंतर 5 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी लुधियानाच्या साऊथ सिटी परिसराची घेराबंदी केली. पण पोलिसांना पाहताच योगेंद्रने मोटारसायकल जोरात दामटण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा बराच पाठलाग केल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.
दाढी वाढली, रुप बदललं
पोलिसांनी अटक केल्यावर त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी मला वाटलं पोलीस आता मला विसरले असतील, असं त्याने सांगितलं. नव्या ओळखीमुळे त्याला टेन्शन फ्रि झाल्यासारखं वाटत होतं. 25 वर्षात त्याचं रुपच पालटलं होतं. त्याने सफेद दाढी वाढवली होती. तो सामान्य पंजाबी नागरिकासारखा राहत होता.