नोकरीच्या शोधात नगरपालिकेत आली, पण अधिकारी धड बोलतही नसल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल; पण…

नोकरीच्या शोधात असलेल्या महिलेने तणावातून अंबरनाथ नगरपालिकेच्या इमारतीवरुन उडी घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे महिलेला वाचवण्यात यश आले आहे.

नोकरीच्या शोधात नगरपालिकेत आली, पण अधिकारी धड बोलतही नसल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल; पण...
अंबरनाथ नगरपालिकेच्या इमारतीवरुन महिलेचा उडी घेण्याचा प्रयत्न
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 03, 2023 | 1:18 PM

अंबरनाथ / निनाद करमरकर : अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीवरून एका महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्या महिलेला अडवल्याने मोठा अनर्थ टळला. सुरक्षारक्षकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर महिला मूळची औरंगाबादची असून, नोकरी मिळवण्यासाठी बुधवारी दुपारी अंबरनाथ नगरपालिकेत आली होती. मात्र पालिकेतील कोणत्याही अधिकाऱ्याने तिला योग्य उत्तर न दिल्याने ती त्रस्त झाली. यानंतर तणावात तिने नगरपालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला.

पती सांभाळत नसल्याने आर्थिक विवंचनेत होती महिला

सदर पीडित महिलेचे आपल्या पतीसोबत पटत नसल्याने आणि तिच्या पतीने दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याने ही महिला आर्थिक विवंचनेत सापडली होती. या महिलेची सर्व कागदपत्रं देखील तिच्या नवऱ्याने जाळल्याने तिला नोकरी मिळणे देखील अवघड जात होते. या महिलेने पूर्वी नर्स म्हणून रुग्णालयामध्ये काम देखील केले होते. मात्र आता नोकरी नसल्यामुळे तिच्यासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला होता.

नोकरीच्या शोधात अंबरनाथ नगरपालिकेत आली होती

बुधवारी नोकरीच्या शोधात ही महिला पालिका कार्यालयात आली, मात्र तिला कोणत्याही अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर न दिल्यामुळे ती त्रस्त झाली. यानंतर ती थेट पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली अन् तिने सुरुवातीला आपल्या पायातील चप्पल आणि हातातील पर्स खाली फेकली. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली आणि त्या महिलेने उडी मारण्याच्या आधीच पकडले. त्यानंतर त्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व कामकाज गेल्यानंतर ही इमारत मंत्रालयाच्या इमारतीप्रमाणेच सर्वसामान्य आणि त्रस्त नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्रस्त झालेले नागरिक प्रशासनाला घाबरवण्यासाठी या इमारतीवरून उडी मारण्याची शक्यता या आधीच वर्तवण्यात येत होती. प्रशासनाला देखील ज्या गोष्टीची भीती होती, तोच प्रकार बुधवारी दुपारी घडता घडता राहिला.