विकृती अन् अंधश्रद्धेचा कळस! अघोरी विद्येसाठी तिच्या मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपलं; मांत्रिकाला चक्क 50 हजारांना…

| Updated on: Mar 10, 2023 | 5:33 PM

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विकृती अन् अंधश्रद्धेचा कळस! अघोरी विद्येसाठी तिच्या मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपलं; मांत्रिकाला चक्क 50 हजारांना...
जादूटोण्याच्या संशयातून दिराने वहिनीला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे / योगेश बोरसे : बीडमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला लाज आणणारा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सासू आणि दिराने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांञिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तक्रारदार पीडितेनं गुन्हा दाखल केला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी बीड पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.

मासिक पाळीचे रक्त मांत्रिकाला विकले

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट 2022 मधील हा प्रकार घडला आहे. आपण बीडला सासरी गेलो असताना सासू आणि दिराने आपल्यासोबत हा घाणेरडा प्रकार करून हे मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा केलं. यानंतर हे रक्त मांञिकाला 50 हजारांना विकल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दोन वर्षापूर्वी पीडितेचा प्रेमविवाह झाला होता

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर महिला पतीसोबत बीड जिल्ह्यातील आपल्या सासरी रहायला गेली. यानंतर मासिक पाळीनंतर सासरच्या मंडळीनी तिचे हातपाय बांधून पाळीचे रक्त कापसाने टिपून बाटलीत भरले. यानंतर हे रक्त 50 हजारात जादूटोण्यासाठी मांत्रिकाला विकले.

हे सुद्धा वाचा

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर पीडित महिला माहेरी विश्रांतवाडी येथे आल्यानंतर तिने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितले. यानंतर आई-वडिलांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून थेट विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये विश्रांतवाडी पोलीस कामकाज स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला.