मुंबईत दोस्ती, पण पुण्यात कुस्ती; भाजप-शिवसेना शिंदे गट कुठे एकत्र लढणार, कुठे विरोधात? पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती कोठे झाली आहे आणि कोणत्या शहरांत ते स्वतंत्र लढणार आहेत याची संपूर्ण यादी.

राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल मंगळवारी (३० डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या उत्साहात आपले शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. यंदाच्या महापालिका निवडणुकीत राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित समीकरणे आणि नवीन आघाड्या पाहायला मिळत आहेत.
मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी भाजप १३७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला ९० जागा आल्या आहेत. दोन्ही पक्ष आपल्या कोट्यातील काही जागा मित्रपक्षांनाही सोडणार आहेत. तर ठाणे, जळगाव आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
एककीडे मुंबई-ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असली तरी, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागावाटपाचा तोडगा न निघाल्याने ही युती तुटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भाजप आणि शिवसेना युती नसलेली शहरे (स्वतंत्र लढणार)
- पुणे
- छत्रपती संभाजीनगर
- नाशिक
- नांदेड
- अमरावती
- मालेगाव
- अकोला
- मीरा-भाईंदर
- नवी मुंबई
- धुळे
- उल्हासनगर
- सांगली
- जालना
- पिंपरी चिंचवड
- परभणी
- सोलापूर
- लातूर
- अहिल्यानगर
भाजप आणि शिवसेना युती असलेली शहरे (एकत्र लढणार)
- मुंबई
- ठाणे
- जळगाव
- पनवेल
- नागपूर
- भिवंडी
- कोल्हापूर
- चंद्रपूर
- वसई विरार
- कल्याण डोंबिवली
- इचलकरंजी
महायुतीला आव्हान
दरम्यान मुंबई महानगरपालिकेत यावेळी मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महायुतीला आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
- अर्जांची छाननी: ३१ डिसेंबर
- अर्ज मागे घेण्याची मुदत: २ जानेवारी
- उमेदवारांची अंतिम यादी: ३ जानेवारी
- मतदान: १५ जानेवारी
- निकाल: १६ जानेवारी
