मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची दहशत, तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, परिसरात चोरांचाही सुळसुळाट

| Updated on: Jul 10, 2021 | 10:52 PM

सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे (Youth beaten up by drug addicts at Miraj railway station).

मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची दहशत, तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, परिसरात चोरांचाही सुळसुळाट
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

सांगली : सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मिरज रेल्वे स्थानकावर काही भुरटे चोर सर्रासपणे चोरी करत आहेत. त्यांना पोलिसांचे भय राहिलेले नाही. रेल्वे स्थानकावर चोरांचा सुळसुळाट तर आहेच याशिवाय तिथे काही नशेबाज तरुणांची देखील प्रचंड दादागिरी सुरु आहे. हे नशेबाज तरुण रेल्वे स्थानकांवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना छळण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न करतात. तसेच जर कुणी त्यांचा प्रतिकार केला तर ते सर्व एकत्र मिळून प्रवाशांना मारहाण करत असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात या सगळ्या घडामोडी घडत असताना प्रशासन नेमकं काय करतंय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय (Youth beaten up by drug addicts at Miraj railway station).

रेल्वे स्थानक परिसरात नशेबाजांची तरुणाला मारहाण

मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची प्रचंड दादागिरी सुरु आहे. त्यांचा हा मुजोरपणा आता कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. काही नशेबाज तरुण रेल्वे स्थानकावर आलेल्या एका तरुणाला लुटण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी ते त्याला त्रास देत होते. मुलाने त्यांना प्रतिकार केला तर त्यांनी तरुणाला मारहाण केली. हा सर्व प्रकार घटनास्थळी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलमध्ये अचूकपणे कैद केला आहे. संबंधित व्हिडीओत नशेबाज तरुणाला अमानुषपणे मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत (Youth beaten up by drug addicts at Miraj railway station).

जखमी तरुणाकडून पोलिसात तक्रार नाही

दरम्यान, संबंधित मारहाणीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नशेबाज तरुणांना ताब्यात घेतलं. नशेबाजांनी तरुणाला इतकी मारहाण केली की पीडित तरुण हा जखमी झाला. मात्र, या तरुणाने अद्याप त्यांच्याविरोधात तक्रार दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे नशेबाजांनी पीडित तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला होता. तरीही जखमी तरुणाने त्यांच्याविरोधात तक्रार दिलेली नाही.

हेही वाचा : रेल्वेत घुसून गर्दीचा फायदा घ्यायचा, संधी मिळताच डाव साधायचा, सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या