
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील अलिगढमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. अलिगढमध्ये सासूच आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. त्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना आता मेरठमधून समोर आली आहे. नवरदेव आपली वरात घेऊन होणाऱ्या पत्नीच्या घरी पोहोचला, त्यावेळी तो खूप आनंदी होता, मात्र जेव्हा कबूलनामा झाला तेव्हा या तरुणाला मोठा धक्का बसला. त्याचं लग्न तरुणीसोबत नाही तर त्याच्या 45 वर्षांच्या सासूसोबत लावून देण्यात आलं होतं, तरुणाच्या जेव्हा ही घटना लक्षात आली, तेव्हा त्याने याला विरोध केला. तरुणाने विरोध केल्यानं त्याला मारहाण देखील करण्यात आली तसेच धमकावल्याचा देखील आरोप होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मेरठ जिल्ह्यात राहाणाऱ्या एका तरुणाने असा आरोप केला आहे की, त्याचं लग्न एका तरुणीसोबत निश्चित करण्यात आलं होतं, मात्र सासरच्या लोकांनी त्याला धोका दिला, त्याचं लग्न मुलीसोबत न लावता मुलीच्या आईसोबत म्हणजे त्याच्या सासूसोबत लावण्यात आलं. मात्र या प्रकरणात आता पोलिसांनी दावा केला आहे की, संबंधित तरुणानं आपली तक्रार मागे घेतली आहे. दोन्ही पक्षांमधील वाद मिटला आहे.
मोहम्मद अजीम 22 असं या प्रकरणातील तरुणाचं नाव आहे, त्याने केलेल्या आरोपानुसार त्याचं लग्न शामली जिल्ह्यातील कंकरखेडा परिसरात राहाणाऱ्या 21 वर्षीय मंतशा सोबत निश्चित करण्यात आलं होतं. त्याला लग्न जमावताना मंताशाचा फोटो दाखवण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्याचं लग्न मंताशाच्या आईसोबत करण्यात आलं.एवढंच नाही तर लग्न करण्यासाठी आपल्याकडून पाच लाख रुपये देखील घेण्यात आले, असा आरोपही या तरुणानं केला आहे. जेव्हा आपण याला विरोध केला तेव्हा मला मारहाण करून धमकी देखील देण्यात आली, असा आरोप या तरुणानं केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मात्र या तरुणानं आपली तक्रार मागे घेतल्याचा दावा या प्रकरणात पोलिसांनी केला आहे.