11th Admissions: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत होणार कांटे की टक्कर! 3 ऑगस्टला पहिली यादी

| Updated on: Jul 30, 2022 | 9:57 AM

यंदा गुणवंताची संख्या जास्त असल्याने बहुतांश गुणवंत विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कटऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल असेही महाविद्यालयातून सांगण्यात येतंय.

11th Admissions: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत होणार कांटे की टक्कर! 3 ऑगस्टला पहिली यादी
NEET PG allotment
Image Credit source: Social Media
Follow us on

अकरावी प्रवेशाच्या (11th Admissions) पहिल्या यादीत नामवंत महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात कटऑफ (Cut Off) वाढून कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्याबरोबर आयसीएसई आणि सीबीएसई विद्यार्थ्यांनाही यावर्षी 90 टक्केहून अधिक गुण आहेत. यामुळे या यादीत मोठी चुरस होण्याची शक्यता प्राचार्य व्यक्त करत आहेत. 95 ते 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज 3 हजार 800 आहेत. त्याबरोबर 75 ते 95 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये 1 लाख 1 हजार आहेत. तर 75 टक्के हून कमी गुण असलेले 1 लाख 75 हजार विद्यार्थी आतापर्यंत नोंदणी केलेल्या यादीत आहेत. यंदा गुणवंताची संख्या जास्त असल्याने बहुतांश गुणवंत विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कटऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल असेही महाविद्यालयातून (Junior Colleges) सांगण्यात येतंय.

पसंतीक्रमांक भरायचा आज शेवटचा दिवस

सीबीएसई आणि आयसीएसईच्या मंडळाचे 95 आणि 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी व राज्य मंडळाच्या नव्वद टक्केहून अधिक गुण असलेले विद्यार्थी यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. 95 ते 100 टक्के गुण मिळवणाऱ्या सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अकरावीच्या प्रवेशात आले आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत नामवंत महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात कटऑफ वाढून कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची नोंदणी सध्या बंद असून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला भाग भरलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देण्यात येणारा भाग 2 भरून देण्याची मुदत आज शनिवारपर्यंत आहे. त्यानंतर सर्वसाधारण यादी पुन्हा संकेतस्थळावर विद्याथ्र्यांच्या माहितीसाठी अपलोड केली जाणार आहे. 3 ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पसंतीक्रम भरून अंतिम केले आहेत अशा विद्यार्थ्यांना पहिल्या यादीतून प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.

…तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार

3 ऑगस्टच्या पहिल्या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जर मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे. त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी धडपड करावी लागणार आहे. जर पालकांनी पसंतीक्रम देताना गुण आणि महाविद्यालयातील कटऑफ याचा ताळमेळ बसवला असल्यास पहिल्या यादीत प्रवेश मिळतील असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.