Success Story : पाचवी नापास… UPSC परीक्षेत 3 वेळा अपयश, पण ती मागे हटली नाही; चौथ्या प्रयत्नात बनली IAS

UPSC Success Story : नेहा यांना यूपीएससी परीक्षेत सलग तीन वेळा अपयश आले होते, मात्र त्यांनी हार मानली नाही. कठोर मेहनतीनंतर 2021 च्या परीक्षेत त्यांनी आयएएसपदाला गवसणी घातली. त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात.

Success Story : पाचवी नापास... UPSC परीक्षेत 3 वेळा अपयश, पण ती मागे हटली नाही; चौथ्या प्रयत्नात बनली IAS
ias neha byadwal success story
Image Credit source: Google
| Updated on: Jun 30, 2026 | 5:37 PM

युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक आहे. यासाठी कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीची गरज असते. IAS अधिकारी नेहा ब्याडवाल यांची यशोगाथा याचे जिवंत उदाहरण आहे. नेहा यांना यूपीएससी परीक्षेत सलग तीन वेळा अपयश आले होते, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्या कठीण काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच त्या मेहनत करत राहिल्या आणि नव्या जोमाने पुन्हा तयारी केली आणि त्यांनी यश मिळवले. आज आपण त्यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊयात.

पाचवी नापास

नेहा यांचा जन्म राजस्थानमधील जयपूर येथे झाला. मात्र त्यांचे बालपण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये गेले. त्यांचे वडील श्रवण कुमार हे आयकर विभागात कार्यरत होते, त्यामुळे बदली झाल्यानंतर त्यांना सतत शाळा बदलावी लागत होती. त्यांनी जयपूर, बिलासपूर, भोपालमधील किड्स हायस्कूल आणि डीपीएस कोरबा अशा विविध शाळांमध्ये शिक्षण घेतले. सतत बदलणारे वातावरण आणि नवीन भाषा यामुळे जुळवून घेण्यासाठी वेळ लागत होता. याच कारणामुळे त्या पाचवीत नापासही झाल्या होत्या.

विद्यापीठात पहिला क्रमांक

नेहा ब्याडवाल यांनी माध्यमिक शिक्षणानंतर रायपूरमधील डीबी गर्ल्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना नागरी सेवेत जाण्यासाठी प्रेरित केले. त्यानंतर त्यांनी IAS अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

यूपीएससीमध्ये सलग तीन वेळा अपयश

युपीएससी परीक्षेत नेहा यांनी सलग तीन प्रयत्नांमध्ये अपयश आले. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांना खचू दिले नाही. सतत प्रोत्साहन देत पुन्हा तयारी करण्यासाठी प्रेरित केले. एका मुलाखतीत नेहा म्हणाल्या की, प्रयत्न करताना अनेक चुका झाल्या, अनेक अडचणी आल्या. पण माझ्या कुटुंबाने मला नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा दिली. कठीण काळातच आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधी मिळते.’

चौथ्या प्रयत्नात यश; वयाच्या 24व्या वर्षी बनल्या IAS

कठोर मेहनत केल्यानंतर अखेर तो दिवस उजाडला ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा 2021 मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक 569 मिळवली. अवघ्या 24व्या वर्षी गुजरात कॅडरच्या IAS अधिकारी बनल्या. निकालाच्या दिवसाची आठवण सांगताना त्या म्हाल्या की, ‘चौथ्या प्रयत्नात माझे स्वप्न पूर्ण झाले. निकालाच्या दिवशी मी बाहेरून कमी, पण मनातून खूप रडले. माझ्या कुटुंबाच्या डोळ्यातील आनंद पाहून माझ्या सर्व मेहनतीचे चीज झाल्याची जाणीव झाली. त्या क्षणाचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. सध्या IAS नेहा ब्याडवाल या उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्याच्या मुख्य विकास अधिकारी (CDO) म्हणून कार्यरत आहेत.

Follow Us