नवी मुंबईत अग्नी तांडव! तेलाचे गोदाम आगीच्या विळख्यात; प्लायवूड आणि कुरिअर फर्म जळून खाक
या ठिकाणी स्टोअर केलेला लाखो ते करोडो रुपयांचा माल आगीत पूर्णपणे नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवी मुंबई मधील वाशी इथल्या सेक्टर १८/माफको मार्केट परिसरात रविवारी रात्री उशिरा एका तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. यामुळे संपूर्ण परिसरातच खळबळ उडाली. आग काही वेळातच एवढी पसरली की आजूबाजूला असलेल्या प्लायवूड आणि कुरिअर कंपनीपर्यंत पसरली. पहाटे २:०० वाजेपर्यंत आगीच्या उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट आकाशात उठताना दिसत होते. सुदैवाची गोष्ट म्हणजे, रविवारची सुटी असल्याने कंपन्यांमध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते. यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
आग कशी पसरली?
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाशी येथील एका तेल कंपनीच्या गोदामात अचानक आग लागली. तेथे मोठ्या प्रमाणात तेल आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने, आग वेगाने भडकली. काही वेळातच या आगीने भीषण आणि धोकादायक रूप धारण केले.
आगीच्या विळख्यात तीन कंपन्या!
आग एवढी मोठी होती की हळू हळू आजूबाजूच्या कंपनीमधेही पसरली. यामुळे शेजारील प्लायवूड युनिट आणि एका कुरिअर कंपनीलाही मोठे नुकसान झाले. लाकूड आणि पॅकेजिंग साहित्यामुळे आग विझवण्याचे काम अत्यंत कठीण झाले. स्थानिक रहिवाशांनी या घटनेदरम्यान स्फोटासारखे मोठे आवाज ऐकल्याचेही सांगितले, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली.
अग्निशमन दलाची बचाव मोहीम
घटनेची माहिती मिळताच, नवी मुंबई अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खबरदारीचा उपाय म्हणून, परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आगीला इतर औद्योगिक युनिट्सपर्यंत पसरण्यापासून रोखण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व बाजूंनी पाण्याचा मारा केला आणि अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
कोटींचे नुकसान
या आगीत तिन्ही कंपन्यांमध्ये साठवून ठेवलेला लाखो ते कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे या घटनेचा तपास करत आहेत.
