MPSC Recruitment : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, या महत्त्वाच्या परीक्षेसाठी पदसंख्या वाढली, आता 16 हजार 717 पदांसाठी भरती

या परीक्षेसाठी यापूर्वी २५ जून २०२६ रोजी २ हजार ६१९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलै २०२६ च्या शुद्धिपत्रकाद्वारे आणखी ३ हजार ८८ पदांचा समावेश करण्यात आला.

MPSC Recruitment : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, या महत्त्वाच्या परीक्षेसाठी पदसंख्या वाढली, आता 16 हजार 717 पदांसाठी भरती
mpsc recruitment
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 10:20 PM

MPSC Recruitment Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ५ हजार ७०७ पदांसाठी जाहीर झालेल्या या परीक्षेत आता आणखी ११ हजार १० पदांचा समावेश करण्यात आला असून, एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्यातील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगास प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रांनुसार पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे.

Loading...

या परीक्षेसाठी यापूर्वी २५ जून २०२६ रोजी २ हजार ६१९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलै २०२६ च्या शुद्धिपत्रकाद्वारे आणखी ३ हजार ८८ पदांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे पदसंख्या ५ हजार ७०७ झाली होती. आता नव्याने ११ हजार १० पदांचा समावेश झाल्याने एकूण पदसंख्या १६ हजार ७१७ झाली आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी पात्र उमेदवारांनाही मिळणार आहे.

१३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज व विकल्प सादर करता येणार

वाढीव पदसंख्येच्या अनुषंगाने उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी अर्ज केलेल्या आणि शैक्षणिक अर्हतेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या एकापेक्षा अधिक संवर्गांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना विकल्प सादर करता येणार आहेत. त्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नव्याने अर्ज तसेच विकल्प सादर करण्यासाठी १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पूर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने

विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम लागू राहणार असून परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्यात येईल.

सामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या गट-क सेवेतील प्रशासकीय संवर्गांच्या मुख्य परीक्षेचे आयोजन विहित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार करण्यात येणार आहे. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार असून, संबंधित संवर्गांचा अभ्यासक्रम प्राधान्याने तयार करून आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पूर्व परीक्षा २४ जानेवारी २०२७ रोजी

वाढीव पदसंख्येमुळे नव्याने अर्ज स्वीकारणे आणि यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांकडून विकल्प घेण्यासाठी पुरेसा कालावधी देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ३ जानेवारी २०२७ रोजी नियोजित असलेली ही परीक्षा आता २४ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे.

पदसंख्येतील वाढ आणि परीक्षा योजनेतील बदलासंदर्भातील शुद्धिपत्रके आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवारांनी या शुद्धिपत्रकांचे अवलोकन करून त्यानुसार पुढील कार्यवाही करावी,असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us