मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, अचानक आणली ही मशीन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी काल अखेर थांबली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष मतदानाच्या तयारी लागलेले आहेत. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ईव्हीएमसोबत अचानक एक नवीन मशीन आणली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.

मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, अचानक आणली ही मशीन
Election commission
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 14, 2026 | 1:56 PM

राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. उद्या 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, मतदानाला एक दिवस शिल्लक असताना राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यात खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगाने एक नवे मशीन आणले आहे. या मशीनीला आम आदमी पार्टीने विरोध केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएम (EVM) सोबत मत मोजणीसाठी नवीन मशीन (PADU)चा वापर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी या मशीन वापरावर संशय व्यक्त केला. तसेच आम आदमी पार्टीने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहित या नव्या मशीनीचा वापर करण्यास केंद्र निवडणुक आयोगाची मंजूरी नसल्याचे म्हटले आहे. तसेच हा मतचोरीचा प्रयत्न असल्याचा दावा देखील केला आहे.

आम आदमी पार्टीचा विरोध

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रिती मेनन यांनी, ‘हा ‘मत चोरी’चा आणखी एक प्रयत्न आहे. कालच्या सर्वपक्षीय बैठकीत आम्हाला सांगण्यात आले की, ईव्हीएम (EVM) च्या डिस्प्ले युनिटमध्ये बिघाड झाल्यास एक नवीन मशीन – ‘प्रिंटिंग अँड ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट्स’ (PADU – पाडू) वापरली जाईल आणि ही मशीन निकाल प्रदर्शित करेल. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, ईव्हीएम – कंट्रोल युनिट (CUs) आणि बॅलट युनिट (BUs) साठी राज्य निवडणूक आयोगाने अनिवार्य केलेले कठोर रँडमायझेशन आणि तपासणी प्रोटोकॉल आहेत. ज्यात पक्षांच्या प्रतिनिधींचाही सहभाग असतो. पण या ‘पाडू’ मशीनसाठी असा कोणताही प्रोटोकॉल नाही. मग आम्ही हे कसे सुनिश्चित करू शकतो की, या ‘पाडू’ मशीन खरे निकाल दाखवत आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड केली जात नाही?’ असे म्हटले आहे.

राज ठाकरेंचा नव्या मशीनबाबत सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना, पाडू (PAU – Printing Auxiliary Unit) नावाची मशीन आणली आहे. प्रिटिंग ऑक्झिलरी युनिट कोणत्याही पक्षाला दाखवलं नाही. लोकांना माहीत नाही. उद्धव ठाकरे यांचं पत्र निवडणूक आयोगाला गेलं, हे मशीन दाखवावं सांगावं इथपर्यंत सौजन्य नाही. हे वाघमारे सांगत नाही, आताच्या सरकारने वाघ कधीच मारला. ही कोणती प्रथा आहे? कोणती गोष्ट चालू आहे? कायदा बदलत आहेत. सर्वांनी हे प्रश्न विचारले पाहिजे. सरकारला जी गोष्ट हवी आहे, त्यासाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारसाठी निवडणूक आयोग काम करतंय का? अशा शब्दात ठणकावले.