
अरुणाचल प्रदेश विधानसभेचे निवडणूक कल आता निकालात बदलत आहेत. अरुणाचल प्रदेशात भाजप पुन्हा निर्विवाद बहुमताकडे दमदार वाटचाल करत आहे. भाजपने ही निवडणूक मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली लढवली. पेमा खांडू यांनी स्वत:सह दहा जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आणल्या होत्या. यंदा भाजप 2019 पेक्षाही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 2019 मध्ये भाजपने 41 जागा जिंकल्या होत्या. आता हा आकडा 47 पर्यंत पोहचला आहे. कधीकाळी काँग्रेसमध्ये राहिलेले पेमा खांडू प्रथम 2016 मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून शानदार विजय मिळवून दिला. आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री बनणार आहे.
21 ऑगस्ट 1979 मध्ये जन्मलेले पेमा खांडू यांचे कुटुंब राजकारणात होते. त्यांचे वडील दोरजी खांडू राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते मोनपा जनजातीतून येतात. दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर 2000 मध्ये काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले. प्रथम 30 जून 2011 रोजी ते बिनविरोध निवडून आले. त्यानंतर त्यांचा अरुणाचल प्रदेशातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलसारख्या खेळांमध्ये पेमा खंडू यांना आवड होती. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर त्यांनी खेळाला प्राधान्य देत अनेक योजना आणल्या. 2014 मध्ये मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्यांना शहर विकास मंत्री करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात नाराज नेता कलिखो पूल यांची साथ देत पद सोडले.
खांडू यांनी काँग्रेसमध्ये बंड पुकारले. त्यांनी नेतृत्वाला पत्र लिहिले. त्यात म्हटले की “तुमच्या (तुकी) नेतृत्व वाली सरकार राज्यातील जनतेचा विश्वास संपादन करु शकली नाही. पक्षात लोकशाही नाही. तसेच राजकीय स्थैर्य राहिले नाही. यामुळे शासन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यामुळे तुकी सरकारने राजीनामा दिला पाहिजे.
16 जुलै 2016 रोजी नबाम तुकी यांच्या जागी पेमा खांडू यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. 37 व्या वर्षी खांडू मुख्यमंत्री झाली. त्यानंतर 16 सप्टेंबर 2016 रोजी पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली 43 आमदारांनी काँग्रेसमध्ये बंड केले. ते भाजपच्या नेतृत्वाखाली सहयोगी पीपुल्स पार्टी ऑफ (पीपीपी) मध्ये सहभागी झाले आणि भाजपसोबत सरकार बनवली. आता 2024 मध्ये पेमा खांडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहे.