
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानहानगरपालिका निवडणुका अखेर पार पडल्या आहेत. 15 जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान करण्यात आले. त्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीसाठी काही ठिकाणी महाविकास आघाडी पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीमधील पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढताना दिसले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौर कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
परभणीत शिवसेना उबाठा गटात दोन तगड्या उमेदवारांचा पक्षप्रवेश पार पडला. हा पक्षप्रवेश खासदार जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. ‘आम्ही पैसे वाटून,मतदान याद्यांमध्ये घोळ करून, बोगस मतदारांचा समावेश करून कधी मत घेतले नाहीत. माझं काही चूक असेल तर मी राजीनामा देतो,तुमचं काही चूक असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा’ असे म्हणत खासदार जाधव यांनी पालकमंत्री बोर्डीकरांवर निशाणा साधला.
परभणीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ईच्छूकांचे जोरदार पक्षांतर सुरू आहे. शिवसेना उबाठा गटात जांब जिल्हा परिषद गटासाठी ईच्छुक असलेले प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी तर पूर्णा तालुक्यातील वझुर गटासाठी इच्छुक असलेल्या मुंजाभाऊ कुक्कर यांनी शिवसेना उबाठा गटात खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. तर कातनेश्वर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष ही शिवसेना उबाठा गटात पक्षप्रवेश करणार आहेत.
राज्यस्तराव काम करणारे प्रा. किरण सोनटक्के आमच्या पक्षात आलेत, आम्हाला त्याचा खूप आनंद झालाय,त्यांच्या राज्यभरातील जनसंपर्काचा आमच्या पक्षाला फायदाच होणार असून त्यांचा जसा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सन्मान केला जायचा तसाच सन्मान आमच्या ही पक्षात केला जाईल. कातनेश्वर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष आणि ताडकळसचे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन अंभोरे यांचा ही पक्ष प्रवेश होणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपवर साधला निशाणा
भारतीय जनता पार्टीने निवडणुका खूप अवघड करून ठेवल्या आहेत,पैशाशिवाय आता निवडणुका होत नाहीयेत, ज्या कार्यकर्त्याने सतरंज्या उचलल्या पोलवर चढून झेंडे बांधले अश्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता राहिल्या नाहीत. भारतीय जनता पार्टीने या निवडणूका सगळ्या पैसे वाल्यांच्या करून टाकल्या आहेत. माणसांचा वणवा पेटलाय, मानसे आता जागेवर भेटत नाहीत, पैसे आणायचे कुठून आणि निवडणुका लढवायच्या कुठून अशी सर्वसामान्य कार्यकर्त्याचा समज झालाय असे देखील जाधव म्हणाले.