ZP Election Result : अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं? विजय की पराभव?

ZP Election Result : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या एक तास अगोदर विमानत असताना त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना फोन केला होता. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाली होती.

ZP Election Result : अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं? विजय की पराभव?
Rana Patil
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 09, 2026 | 2:24 PM

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेच्या तेर गटात भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांचा पराभव केला. या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले होते, कारण येथील लढत घराणेशाही, पक्षबदल आणि भावनिक मुद्द्यांशी जोडली गेली होती.

घराणेशाहीचा आरोप आणि माघार घेण्याची तयारी

अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर घराणेशाहीचा जोरदार आरोप झाला. मतदार, नागरिक, माध्यमे आणि सोशल मीडियावरून त्यांच्या उमेदवार जोरदार टीका करण्यात आली होती. यामुळे अर्चना पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दाखवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षने त्यांचा अर्ज कायम ठेवण्याचा आदेश दिला. पक्षश्रद्धा मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि शेवटी विजय मिळवला!

अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल

या निकालाच्या पार्श्वभूमीवर एक भावनिक मुद्दा समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाच्या (२८ जानेवारी २०२६) फक्त एक तास आधी त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना फोन केला होता. मतदारसंघातील एखाद्या कामाबाबत बोलताना राणा पाटील यांच्या निरोपानंतर अजितदादांनी कॉल केला. सुमारे २ मिनिटे बोलणे झाले. त्यात ते बारामतीला पोहोचणार असल्याचे सांगितले. मात्र, विमानतळावर लँडिंगपूर्वीच अपघात झाला.

राणा जगजीतसिंह पाटील हे पवार कुटुंबाचे नातेवाईक आहेत. सुनेत्रा पवार या त्यांच्या सख्ख्या आत्या. पूर्वी पाटील कुटुंब राष्ट्रवादीतच होते, पण राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश केला.

सक्षणा सलगर यांचा पराभव

सक्षणा सलगर या मागील जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. यंदाही पक्षासाठी जोमाने प्रचार करत, राज्यभर फिरून ध्येय-धोरणे पोहोचवत, घणाघाती सभांमध्ये भाषणे देत होत्या. पण भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशा थेट लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर दमदाटी आणि पक्षीय रणनीतीचे आरोप केले आहेत. या निकालाने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, घराणेशाही आणि नातेवाईकत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्चना पाटील यांच्या विजयाने भाजपला धाराशिवमध्ये मजबूत पाया मिळाला आहे.