
सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर 16 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी उलट्यासुलट्या युती आणि आघाड्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच निवडणुकीसाठी प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान, 11 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) संयुक्त सभा होणार आहे. दरम्यान, उद्याच्या मुंबईतील सभेवर मोठं संकट आले आहे. एक बडा वकील कोर्टात जाणार आहे. या वकीलाने काय आक्षेप घेतला आहे चला जाणून घेऊया…
कोण आहे हा वकील?
छत्रपती शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या सभेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हायकोर्टाच्या जजमेंटचा हवाला दिला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला सभा घेता येत नाही असा सदावर्तेंचा दावा आहे. ठाकरे बंधूंना उद्या शिवाजी पार्क मैदानावर कायदेशीर दृष्ट्या उच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये देता येत नाही असे म्हटले आहे.
कधी होणार सभा?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच एकत्र येऊन सभा घेणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या सेभेकडे लक्ष लागले आहे. या सभेमध्ये ठाकरे बंधू काय संदेश देणार आणि काय भूमिका मांडणार याकडे हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे. 11 जानेवारीला ही सभा संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते हे राज्यात नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी याआधी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनादेखील विरोध केला होता. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत धडक दिली होती. त्यांनी जरांगे यांना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. सदावर्ते यांच्या या मागणीनंतर राज्यातील वातावरण तापले होते. त्यानंतर आता त्यांनी ठाकरेंच्या सभेलाही विरोध केला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.