टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; पाहायला मिळणार 15 नायिकांची महावटपौर्णिमा

महानायिकांची महावटपौर्णिमा येत्या रविवारी म्हणजेच 8 जूनला दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; पाहायला मिळणार 15 नायिकांची महावटपौर्णिमा
Vat Purnima special
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2025 | 8:20 PM

वरुण राजाचं आगमन झालं की चाहूल लागते ती वटपौर्णिमा सणाची. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी वटवृक्षाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने या वृक्षाचं संवर्धन केलं जावं हा महत्त्वाचा उद्देश देखिल या सणामागे आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 15 नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत. व्रताचे धागे तोडू पाहणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधातला हा लढा असेल. ज्या वटवृक्षाने दर वटपौर्णिमेला सौभाग्यवतींना आशीर्वाद दिला त्याच्या मुळावर जेव्हा कुणी घाव घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही लढाई कुणा एकाची नसते. तर आपल्यातल्याच असंख्य शुभा, नंदिनी, सायली, कला आणि अबोली सारख्या रणरागिणी एकत्र येतात आणि या प्रवृत्तीचा नायनाट करतात. आजच्या युगाची सती सावित्री कशी असावी याचा आदर्श घालून देतात.

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. पूर्वापार चालत आलेले सण आणि परंपरा आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी भाग पाडतात. वटपौर्णिमा हा सण हे त्याचच एक उत्तम उदाहरण. त्यामुळे वटवृक्षाचं रक्षण करुन स्टार प्रवाहच्या नायिका यंदाची वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहेत.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील शुभा म्हणजेच निवेदिता सराफ म्हणाल्या, “मालिकांमधील सगळ्या नायिकांना एकत्र आणून त्यांच्या पात्राचा विचार करुन गोष्ट लिहिली गेलीय याचं कौतुक वाटतं मला. शूट नाही तर एखादा छान समारंभ सुरु आहे असंच वाटतंय. पूर्वापार चालत आलेल्या सणांमागे खूप चांगला विचार आहे तोच पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. वृक्षसंवर्धन हा विषय सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे. निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलं आहे या निसर्गाला जपणं हे आपलं कर्तव्य आहे.” महावटपौर्णिमेच्या या विशेष भागाच्या निमित्ताने 15 नायिका एकत्र येऊन वटवृक्षाच्या रक्षणासाठी कसा लढा देणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, “हा फक्त महासंगम आहे असं मी म्हणणार नाही. महावटपौर्णिमेच्या निमित्ताने खूप चांगला उपक्रम स्टार प्रवाह वाहिनी राबवते आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपण प्रत्येकानेच जायला हवं. वटपौर्णिमा सण आपल्याला हेच शिकवतो. या विशेष भागातूनही आपल्या रुढी, परंपरा आणि निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे पाहता येईल. झाडांचं संवर्धन करण्यासाठी कशा 15 नायिका एकत्र येऊन लढा देतात याची छान गोष्ट गुंफण्यात आली आहे. या निमित्ताने वडाच्या झाडाजवळ चार दिवस शूट करता आलं. आम्ही सगळ्या नायिका एकत्र होतो. शूट करताना खूपच मजा आली.”