2 भाषेत लिहिलेलं गाणं, कोणालाच अर्थ समजला नाही, तरी देखील देशात ठरलं प्रचंड सुपरहिट
15 वर्षांपूर्वीचं भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट गाणं. जे दोन भाषांमध्ये लिहिले असून देखील कोणालाच त्या गाण्याचा अर्थ माहिती नाही. तरी देखील ऐकू येताच हे गाणं दिवसभर गुणगुणतात लोक.

15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका गाण्याने संपूर्ण देशाला अक्षरशः वेड लावलं होतं. गाण्याचे बोल अनेकांना पूर्णपणे समजले नाही, मात्र त्याचं भन्नाट संगीत आणि गाण्याची हटके शैली यामुळे ते प्रत्येकाच्या ओठांवर आलं. हे गाणं म्हणजे धनुषचं ‘Why This Kolaveri Di’.
2012 मध्ये प्रदर्शित झालेलं हे गाणं तमिळ आणि इंग्रजी भाषेच्या मिश्रणामुळे विशेष चर्चेत आलं. गाण्याचा अर्थ समजत नसतानाही त्याची धून आणि शब्दांची मजेशीर मांडणी लोकांना प्रचंड आवडली. सोशल मीडियावरही गाण्याची मोठी चर्चा झाली आणि यूट्यूबवर त्याने विक्रमात्मक लोकप्रियता मिळवली.
‘Kolaveri Di’चा नेमका अर्थ काय?
‘Kolaveri Di’ हा शब्दप्रयोग तमिळ भाषेतील दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘Kolai’ म्हणजे हत्या किंवा खून, तर ‘Veri’ म्हणजे राग किंवा आवेश. त्यामुळे ‘Kolaveri’चा साधारण अर्थ ‘जानलेवा राग’ किंवा ‘घातक संताप’ असा होतो. ‘Di’ हा तमिळ भाषेत एखाद्या मुलीला किंवा महिलेला संबोधित करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे.
त्यामुळे ‘Why This Kolaveri Di?’ याचा साधारण अर्थ ‘तू एवढी का चिडली आहेस?’ किंवा ‘हा एवढा घातक राग का?’ असा भाव व्यक्त करणारा आहे.
अवघ्या काही मिनिटांत तयार झाली गाण्याची धून
‘Why This Kolaveri Di’ हे गाणं 3 या चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. या गाण्याच्या माध्यमातून संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतविश्वात पदार्पण केलं.
माहितीनुसार, 3च्या निर्मात्या ऐश्वर्या रजनीकांत यांना प्रेमभंगाच्या प्रसंगासाठी हलकंफुलकं आणि मजेशीर गाणं हवं होतं. अनिरुद्ध यांनी अवघ्या 10 मिनिटांत गाण्याची धून तयार केली तर धनुषने त्यावर शब्द लिहिण्यास सुरुवात केली.
सुमारे 20 मिनिटांच्या चर्चेनंतर धनुषने पहिली ओळ गायली ‘Why This Kolaveri Di?’ आणि याच ओळीने पुढे संपूर्ण गाण्याला ओळख मिळवून दिली.
आजही या गाण्याची प्रचंड क्रेझ
आजही ‘Why This Kolaveri Di?’ हे गाणं ऐकलं की 2012 च्या त्या सोशल मीडिया क्रेझची आठवण होते. साधे शब्द, हटके उच्चार आणि कॅची संगीत यांच्या जोरावर भाषेचा अडथळा पार करून देशभर लोकप्रिय होणारं हे गाणं भारतीय पॉप कल्चरमधील एक लक्षात राहिलेलं उदाहरण ठरलं आहे.