फक्त 16 मिनिटांची भूमिका, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, या हॉरर चित्रपटाची जगभरात चर्चा, कुठे पाहू शकता?

सर्वात जास्त कमाई करणारा हॉरर चित्रपट. ज्यामध्ये या अभिनेत्याने साकारली फक्त 16 मिनिटाची खलनायकाची भूमिका. जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार. या खलनायकापुढे बॉलिवूडमधील खलनायक फेल.

फक्त 16 मिनिटांची भूमिका, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, या हॉरर चित्रपटाची जगभरात चर्चा, कुठे पाहू शकता?
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 15, 2026 | 7:15 AM

हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांच्या जगात ‘द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ हा एक असा चित्रपट आहे, ज्याने आजही प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणण्याची ताकद कायम ठेवली आहे. 1991 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले नाही तर ऑस्कर पुरस्कारमध्ये इतिहास घडवत पाच प्रमुख पुरस्कार जिंकले. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता सुमारे 35 वर्षे पूर्ण झाली आहेत.

हा चित्रपट प्रसिद्ध लेखक थॉमस हॅरिस यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात जोडी फॉस्टर यांनी एफबीआय ट्रेनी क्लॅरिस स्टार्लिंग ही भूमिका साकारली आहे तर अँथनी हॉपकिन्स यांनी डॉ. हॅनिबल लेक्टर या भयावह पात्राला जीवंत केले. हॉपकिन्स यांनी साकारलेले हे पात्र आजही सिनेइतिहासातील सर्वात भयानक खलनायकांपैकी एक मानले जाते.

चित्रपटात स्कॉट ग्लेन, टेड लेव्हिन आणि अँथनी हेल्ड यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे अँथनी हॉपकिन्स यांना या चित्रपटात केवळ 16 मिनिटांचा स्क्रीन टाइम मिळाला होता तरीही त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेताचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

कमी बजेट, पण जबरदस्त कमाई

या चित्रपटाचे बजेट सुमारे 19 मिलियन डॉलर्स इतके होते. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जगभरात जवळपास 272.7 मिलियन डॉलर्सची कमाई केली. अमेरिकेतच या चित्रपटाने 130 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट त्या काळातील मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला. 1991 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर होता.

1992 मध्ये झालेल्या 64 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मोठा इतिहास रचला. या चित्रपटाने बिग फाइव्ह मानल्या जाणाऱ्या पाच प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. यात बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बेस्ट अ‍ॅडॅप्टेड स्क्रीनप्ले या पुरस्कारांचा समावेश होता. विशेष म्हणजे बेस्ट पिक्चर जिंकणारा हा पहिला हॉरर चित्रपट ठरला.

भारतात कुठे पाहता येईल?

आजही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. भारतात ‘द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ हा चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याचा हिंदी डब्ड व्हर्जनही उपलब्ध आहे. मात्र बहुतेक प्रेक्षकांना मूळ इंग्रजी आवृत्ती अधिक आवडते.

Follow Us