
या बुधवारी म्हणजेच 4 मार्च रोजी चित्रपट कॅटलॉगिंग प्लॅटफॉर्म Letterboxd ने युजर रेटिंगच्या आधारे टॉप 500 चित्रपटांची नवी यादी जाहीर केली. जगभरातील चित्रपट प्रेमी या प्लॅटफॉर्मवर चित्रपटांना रेटिंग देतात आणि आपली मतं नोंदवतात. काळानुसार लेटरबॉक्स्डची लोकप्रियता प्रचंड वाढली असून ही यादी प्रेक्षकांच्या पसंतीचे महत्त्वाचे प्रतिबिंब मानली जाते.
या नव्या यादीत हॉलीवूड आणि जपानी चित्रपटांचे वर्चस्व दिसून येत असले तरी भारतीय चित्रपटांनाही दमदार स्थान मिळाले आहे. भारतातील एकूण 9 चित्रपटांनी या प्रतिष्ठेच्या यादीत स्थान मिळवले आहे. विविध भाषा आणि चित्रपटसृष्टीतून आलेल्या या चित्रपटांनी भारतीय सिनेमाची समृद्ध परंपरा आणि वैविध्य पुन्हा अधोरेखित केले आहे.
‘अपूर संसार’ला 93वे स्थान
भारतीय चित्रपटांपैकी सर्वाधिक मानांकन अपुर संसार या चित्रपटाला मिळाले असून तो 93व्या क्रमांकावर आहे. हा सिनेइतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कारण ही रँकिंग जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीवर आधारित आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज दिग्दर्शक सत्यजित रे यांनी केले होते. ‘अपुर संसार’ हा त्यांच्या प्रसिद्ध ‘अपू ट्रिलॉजी’चा शेवटचा भाग आहे. तर इतर दोन चित्रपट म्हणजे पथेर पांचाली आणि अपराजितो हे देखील या यादीत स्थान पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. ‘पथेर पांचाली’ला 139वे तर ‘अपराजितो’ला 211वे स्थान मिळाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीही गौरव
दोन दशकांपूर्वी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिक The Guardian ने ‘100 Films To See Before You Die’ या यादीतही ‘अपू ट्रिलॉजी’चा समावेश केला होता. त्यावेळी मदर इंडिया आणि नायकन या भारतीय चित्रपटांनाही मानाचे स्थान मिळाले होते. यावरून भारतीय क्लासिक चित्रपटांचे जागतिक स्तरावर सातत्याने होत असलेले कौतुक स्पष्ट होते.
या नव्या यादीत ‘अपूर संसार’ व्यतिरिक्त आणखी काही भारतीय चित्रपटांनी स्थान मिळवले आहे. त्यामध्ये मैयाझगन, कुंबलंगी नाइट्स, आरआरआर, गैंग्स ऑफ वासेपुर 2, 3 इडियट्स आणि 12वीं फेल या चित्रपटांचा समावेश आहे. ‘अपुर संसार’ या चित्रपटाने बजेटच्या 80 पट अधिक कमाई केली. या चित्रपटाचा 15 वर्षे कोणी रेकॉर्ड मोडू शकले नाही. त्यानंतर आज 67 वर्षांनंतर या चित्रपटाने आणखी एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे.