
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अनेक हॉरर चित्रपटांना नवसंजीवनी मिळाली आहे. फोक हॉरर, स्लो-बर्न हॉरर, डेमॉनोलॉजी आणि फाउंड-फुटेजसारखे प्रयोगशील चित्रपट आता सहज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.

आज आम्ही अशाच एका चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जो प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, मात्र आज यूट्यूबवर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहत आहेत.

2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परी’ हा एक हॉरर-ड्रामा चित्रपट होता. बॉलिवूडमधील पारंपरिक हॉरर चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची मांडणी पूर्णपणे वेगळी होती. चित्रपटात अनुष्का शर्मा, परमब्रत चॅटर्जी, रजत कपूर आणि रिताभरी चक्रवर्ती यांसारख्या दमदार कलाकार होते.

‘परी’ चित्रपटाची कथा जिन्नांच्या जगाभोवती फिरते. चित्रपटात एका रहस्यमय आणि धोकादायक कल्टचा उल्लेख आहे, जो वाईट शक्तींच्या मदतीने आपला वंश पुढे नेण्याचा प्रयत्न करतो.

कथानकात अर्नब नावाचा तरुण एका जंगलातील घरात रुखसाना नावाच्या मुलीला साखळ्यांनी बांधलेल्या अवस्थेत पाहतो. तिची दया येऊन तो तिला सोडवतो, मात्र हळूहळू रुखसानाशी जोडलेले भयानक आणि धक्कादायक सत्य उलगडत जाते. त्यानंतर संपूर्ण कथेला गूढ आणि भीतीदायक वळण मिळते.

‘परी’ चित्रपटाला थिएटरमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सुमारे 30 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने भारतात 28 ते 29 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सध्या हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध असून त्याला 5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.