40 चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, 46 वर्षांपासून गाणं सुपरहिट
46 वर्षांपूर्वीचं जुनं गाणं, ज्यामध्ये 40 चोरांसोबत जीनत अमानने केला होता डान्स, पाहून प्रत्येकाने धरला होता ठेका. आशा भोसलेच्या आवाजामुळे गाणं आजही सुपरहिट.

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी आहेत, ज्यांची धून कानावर पडताच जुन्या काळातील भव्य सेट, रंगीबेरंगी पोशाख आणि जादुई दुनियेची आठवण होते. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अली बाबा और 40 चोर’ या चित्रपटातील ‘खतूबा’ हे त्यापैकीच एक लोकप्रिय गाणं आहे.
या गाण्यात अभिनेत्री जीनत अमान यांचा ग्लॅमरस अंदाज, आशा भोसले यांचा दमदार आवाज आणि संगीतकार आर. डी. बर्मन यांची खास धून यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतो. गाण्याचं चित्रीकरण गुफेसारख्या भव्य सेटवर करण्यात आलं असून, जीनत अमान 40 चोरांच्या साथीने नृत्य करताना दिसतात. अरबी धाटणीचे पोशाख आणि नेत्रदीपक वातावरणामुळे हे गाणं त्याकाळी विशेष चर्चेत आलं होतं.
या गाण्याला आनंद बक्षी यांनी शब्द दिले होते, तर आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलं होतं. गाण्याच्या धूनमध्ये मध्यपूर्वेतील संगीताची झलक जाणवते. आशा भोसले यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, गाण्याचा उच्चार आणि वातावरण योग्य प्रकारे साधण्यासाठी त्यांनी त्या काळातील काही अस्सल मध्यपूर्वेतील गाणी ऐकली होती.
80 च्या दशकातील लक्षवेधी गाणं
‘अली बाबा और 40 चोर’ हा भारत-सोव्हिएत संयुक्त चित्रपट होता. उमेश मेहरा आणि लतीफ फैजीव यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाची कथा ‘अरेबियन नाइट्स’मधील अली बाबा आणि चाळीस चोरांच्या प्रसिद्ध कथेवर आधारित होती. चित्रपटात धर्मेंद्र यांनी अली बाबाची, हेमा मालिनी यांनी मरजिनाची, तर जीनत अमान यांनी फातिमाची भूमिका साकारली होती.
‘खतूबा’मध्ये जीनत अमान यांच्या नृत्याने विशेष आकर्षण निर्माण केलं. रोमँटिक अंदाजासोबत खोडकरपणा आणि नटखटपणाची झलक असलेलं हे गाणं त्याच्या वेगळ्या धाटणीमुळे आजही जुन्या हिंदी चित्रपटसंगीताच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. भव्य सेट, आकर्षक वेशभूषा, जीनत अमान यांचा अंदाज आणि आशा भोसले-आर. डी. बर्मन यांची जादू यामुळे ‘खतूबा’ हे 1980 च्या दशकातील लक्षवेधी गाण्यांपैकी एक ठरलं. आजही हे गाणं लोक वेळ काढून ऐकताना दिसतात. सोशल मीडियावर देखील या गाण्याचे मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे.