Aaj Shanibar Song: 44 वर्षांपूर्वीचे ते गाणं थेट GTA 6 मध्ये, अचानक कशी मिळाली प्रसिद्धी?
GTA 6 Indian song: सध्या सगळीकडे GTA 6 या गेमची चर्चा सुरु आहे. या गेममध्ये भारतातील 44 वर्षे जुने गाणे वापरण्यात आले आहे. अचानक या गाण्याला इतकी प्रसिद्धी कशी मिळाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गेमर्सचा सर्वात आवडता गेम GTA 6 हा लाँच करण्यात आला. या गेमची क्रेझ संपूर्ण जगात पाहायला मिळाली. पण सर्वांचे लक्ष बॅकग्राऊंडमध्ये वाजत असलेल्या गाण्याने वेधले. भारतातील एक 44 वर्षांपूर्वीचे गाणे GTA 6मध्ये वापरले आहे. आता हे गाणे गेमर्सच्या दुनियेत चर्चेचा विषय ठरत आहे. चला जाणून घेऊया या भारतीय गाण्याविषयी…
आम्ही ज्या गाण्याविषयी बोलत आहोत ते ‘आज शनिबार’ हे बंगाली गाणे आहे. या गाणे गायिका रूपा बिस्वास यांनी गायले आहे. हे गाणे 1982 साली रेकॉर्ड करण्यात आले होते. आता हे गाणे ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ (GTA 6) या व्हिडिओ गेमच्या म्युझिकमध्ये पाहायला मिळत आहे. या गेममध्ये गाडी चालवताना खेळाडू जेव्हा रेडिओ स्टेशन बदलतात, तेव्हा त्यांना ही चार दशकांहून जुनी धून ऐकू येते.
‘आज शनिबार’ला गेमच्या वर्ल्डवाइड एफएम रेडिओ स्टेशनवर स्थान मिळाले आहे. हे रेडिओ स्टेशन जगभरातील विविध प्रकारच्या संगीत आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यामुळे रूपा बिस्वास यांचा आवाज आता अशा आंतरराष्ट्रीय श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे, ज्यांनी कदाचित बंगाली संगीत ऐकण्याचा कधी विचारही केला नसेल.
‘आज शनिबार’ या गाण्याविषयी
सध्या चर्चेत असलेले ‘आज शनिबार’ हे गाणे जवळपास आठ मिनिटांचे आहे. त्याच्या सुरुवातीपासूनच म्युझिक एक वेगळे वातावरण निर्माण करते. यात वेगवान डिस्को ताल आहे, पण तो केवळ पाश्चात्य डिस्को संगीताची नक्कल नाही. भारतीय शास्त्रीय वाद्ये आणि पाश्चात्य संगीताचे अनोखे मिश्रण हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. सरोदचा आवाज, तबल्याचे ताल, इलेक्ट्रिक गिटार आणि बेस एकत्र येऊन एक वेगळेच संगीत तयार झाले आहे. हे म्युझिक एकीकडे ८० च्या दशकातील डिस्कोची आठवण करून देते, तर दुसरीकडे भारतीय संगीत म्हणून आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवते.
रूपा बिस्वास यांच्याविषयी
रूपा बिस्वास कोलकाता येथील गायिका आहेत. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती आणि त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतले होते. १९८१-८२ च्या सुमारास त्या आपल्या भावाला भेटायला कॅनडाला गेल्या होत्या. तिथे कॅलगरी विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध सरोदवादक आशिष खान आणि त्यांचे भाऊ प्रणेश खानही उपस्थित होते. रूपा यांच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी तिच्यासोबत म्युझिक प्रोजेक्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला. अल्बमच्या म्युझिक आणि अरेंजमेंटमध्ये आशिष खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारे ‘आज शनिबार’ या गाण्यासह तीन गाणी आणि एक वाद्यसंगीताचा ट्रॅक असलेला ‘डिस्को जॅझ’ हा अल्बम तयार झाला.