
गोरेगावमधल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी एक मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर असून ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारलेली अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. कांदिवली इथली हेमलता आणि सांताक्रूझ इथली अमरिना झवेरी या दोघींनी मिळून एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना दोघींना मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहाथ पकडलं होतं. हे वृत्त समोर येताच आता अर्चना यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा चार वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
‘मायबाप प्रेक्षकांना तसंच मीडियाला नमस्कार, मी गेली 40 वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे. म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका’, असं अर्चना यांनी म्हटलं आहे.
नोव्हेंबरमध्ये अंधेरी पश्चिम इथल्या एका हॉटेलमध्ये एका बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाइट्सच्या वापरावरून हा वादा सुरू झाला होता. लेझर लाइट्सवरून हेमलता, अमरिना यांनी बिल्डरच्या मुलाशी वाद घातला होता. हा वाद नंतर इतका वाढला की त्याचं हाणामारीत रुपांतर झालं. या वादानंतर 23 नोव्हेंबरला महिलांनी पोलीस ठाण्यात बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी त्यांनी बिल्डरकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. अखेर दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीनंतर ही रक्कम 5.5 कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली.