
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दिग्गज अभिनेते मिलिंद गवळी यांच्या सहजसुंदर अभिनयाने हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. आता नव्या रुपात आणि नवी गोष्ट घेऊन मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतून नामांकित वकील हर्षवर्धन जहागिरदार या पात्राच्या रुपात ते पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत.
हर्षवर्धन जहागिरदार हा कायद्याची उत्तम जाण असणारा निष्णात वकील. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावशाली आहे की प्रतिस्पर्धी वकील त्यांना घाबरतात. हर्षवर्धनच्या मते न्याय हा फक्त सत्याच्या बाजूने उभा राहूनच नाही तर पैसे देऊन विकतही घेतला जाऊ शकतो. प्रचंड अहंकारी असलेला हर्षवर्धन पराभव स्वीकारु शकत नाही. जेव्हा मालिकेची नायिका ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हर्षवर्धनच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी उभी रहाते तेव्हा त्याच्या याच अहंकाराला ठेच पोहोचते आणि तिथूनच सुरुवात होते नव्या लढ्याला.
सीनिअर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागिरदार ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मिलिंद गवळी प्रचंड उत्सुक आहेत. या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणाले, “छोट्या ब्रेकनंतर पुन्हा स्टार प्रवाहची मालिका करतोय. ठरवून हा ब्रेक घेतला होता. कारण आई कुठे काय करते मालिकेत मी साकारलेल्या अनिरुद्ध या पात्राचा प्रेक्षकांच्या मनावर आजही तितकाच प्रभाव आहे. ते पुसणं शक्य नसलं तरी तितक्याच ताकदीचं पात्र निर्माण करण्यासाठी मी आणि स्टार प्रवाह वाहिनीने एकमताने हा ब्रेक घेतला. हर्षवर्धन जहागिरदार निष्णात वकील आहे. माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे कायद्याची त्यांना उत्तम जाण आहे. त्यामुळे ऐकताक्षणीच ही भूमिका खूप जवळची वाटली. वडिलांकडून खूप गोष्टींची माहिती करून घेतोय. ही भूमिका देखील प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.” ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका येत्या 15 डिसेंबरपासून रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.