Aamir Khan family tree : आमिर खानच्या कुटुंबात कोण कोण? अदिती राव हैदरीशीही जवळचं नातं

Aamir Khan : अभिनेता आमिर खानचं कुटुंब खूप मोठं आहे. त्याच्या कुटुंबात आता गौरी स्प्रॅटच्या रुपाने आणखी एका सदस्याचा समावेश झाला आहे. आमिरच्या कुटुंबात कोणाकोणाचा समावेश आहे, ते जाणून घ्या..

Aamir Khan family tree : आमिर खानच्या कुटुंबात कोण कोण? अदिती राव हैदरीशीही जवळचं नातं
आमिर खान, गौरी स्प्रॅट
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 05, 2026 | 3:51 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने आज (5 जुलै 2026) गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. यानिमित्ताने आमिरचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आमिरच्या कुटुंबाचे चित्रपटसृष्टीशी घनिष्ट संबंध आहेत. त्याची दुसरी पत्नी किरण राव ही प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीची नातेवाईक आहे. आमिर खानचे वडील हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते ताहिर हुसैन होते. तर आई झीनत हुसैन आहेत. आमिरचे काका नासिर हुसैन हे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि लेखक आहेत. आमिरला फरहत खान आणि निखत खान ही दोन चुलत भाऊबहिणीसुद्धा आहेत. आमिरचा सख्खा भाऊ फैजल खानसुद्धा अभिनेता होता. मात्र तो सध्या इंडस्ट्रीत कार्यरत नाही.

आमिर खानचे चुलत भाऊ मन्सूर खान हेसुद्धा प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ यांसारखे चित्रपट बनवले आहेत. दुसरीकडे आमिरचा भाचा इम्रान खान हासुद्धा अभिनेता आहे. इम्रान हा आमिरची चुलत बहीण नुझात खान यांचा मुलगा आहे. झैन मारी खान ही आमिर खानची भाची आहे. तर अभिनेत्री झैन ही मन्सूर खान यांची मुलगी आहे. ती ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ या चित्रपटात झळकली आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरीचं आमिर खानशी खूप जवळचं नातं आहे. आमिरची दुसरी पूर्व पत्नी किरण राव आणि अदित राव हैदरी या चुलत बहिणी आहेत. या नात्याने अदिती ही आमिरची वहिनी ठरते. आमिरने याआधी दोनदा लग्न केलं आहे. विशेष म्हणजे घटस्फोटानंतरही त्याचे दोन्ही पूर्व पत्नींसोबत सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या 16 वर्षांनंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमिर आणि रीना यांना जुनैद खान हा मुलगा आणि आयरा खान ही मुलगी आहे. जुनैदनेही वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

आमिर खानने दुसरं लग्न किरण रावशी केलं होतं. 2005 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आमिर आणि किरण यांना आझाद राव खान हा मुलगा आहे. किरण राव प्रसिद्ध दिग्दर्शिका असून ‘लापता लेडीज’ हा तिचा चित्रपट विशेष गाजला होता. आमिरची तिसरी पत्नी गौरी स्प्रॅट ही ‘बी ब्लंट’ सलूनमध्ये भागीदार आणि संचालक आहे. तिचं चित्रपटसृष्टीशी थेट नातं नाही. गौरीचंही हे दुसरं लग्न असून तिला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे.

Follow Us