मोठी बातमी! विरोधी बाकावरील 3 पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार? ऐनवेळी मोठा ट्विस्ट!
माहितीनुसार इंडिया आघाडीतील काही पक्ष या विधेयकाच्या बाबतीत इंडिया आघाडीच्या बाजूने मत देऊ शकतात. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यामध्ये अग्रकमावर असण्याची शक्यता आहे.

Delimitation Bill : केंद्र सरकार संसदेत पुन्हा एकदा महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. राज्यसभेत हे विधेयक पारित व्हावे यासाठी भाजपाकडून विरोधी बाकावरील काही पक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या शरद पवार यांचा गटही या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो. दरम्यान, विरोधी बाकावरील मोठे आणि महत्त्वाचे तीन पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणले जाणार?
सरकारने 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरच हे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेसनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणले जाईल अशी अधिकृत घोषणा अद्याप दिलेली नाही. परंतु पडद्यामागे तशी तयारी सुरू आहे. विरोधी बाकावरील समाजवादी पक्षाने या विधेयकाचा जाहीर विरोध केलाय. हे विधेयक म्हणजे भाजपाची सर्वात मोठी चूक असेल, असं सपाचे अखिलेश यादव म्हणाले आहेत.
समाजवादी पार्टाचा थेट विरोध
हे विधेयक संमत झाल्यास लोकसभेत खासदारांची संख्या वाढून थेट 850 होईल. इंडिया आघाडीत समाजवादी पार्टी हा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाकडे लोकसभेत 37 खासदार आहेत. लोकसभेत काँग्रेसचे 98 खासदार आहेत. राज्यसभेतही सपाचे एकूण पाच खासदार असून काँग्रेसकडे 30 खासदार आहेत.
इंडिया आघाडीत काही पक्षांची वेगळी भूमिका?
सूत्रांच्या माहितीनुसार इंडिया आघाडीतील काही पक्ष या विधेयकाच्या बाबतीत इंडिया आघाडीच्या बाजूने मत देऊ शकतात. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यामध्ये अग्रकमावर असण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही विरोधी बाकावर असलो तरी या विधेयकाला पाठिंबा देऊ, अशी जाहीर घोषणा कोणत्याही विरोधी पक्षाने केलेली नाही. शरद पवार यांच्या पक्षाचे एकूण 8 खासदार आहेत. याशिवाय द्रविड मुन्नेत्र कळघम आणि YSRCP हे दोन्ही पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. हे दोन्ही पक्ष कोणत्याही आघाडीत सहभागी नाहीत. डीएमकेकडे 22 खासदार आहेत. तर YSRCP कडे 4 खासदार आहेत. YSRCP पक्षाने याआधीही काही वेळा एनडीएला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
