AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅक फ्रायडेच्या सेलला Gen-Z चा ठेंगा! शॉपिंगऐवजी ‘नो-बाय चॅलेंज’ची क्रेझ; नेमकं काय आहे हे नवं ट्रेंड?

आकर्षक ऑफर्स, फ्लॅश सेल आणि मर्यादित वेळेच्या डील्स दाखवून ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करणाऱ्या 'ब्लॅक फ्रायडे'च्या दिवशी खरेदी करण्यापासून जनरेशन झी मात्र पाठी जात आहे. असं का होतं आहे याबद्दल जाणून घ्या.

ब्लॅक फ्रायडेच्या सेलला Gen-Z चा ठेंगा! शॉपिंगऐवजी 'नो-बाय चॅलेंज'ची क्रेझ; नेमकं काय आहे हे नवं ट्रेंड?
Black Friday sales impact
| Updated on: Nov 27, 2026 | 2:31 PM
Share

नोव्हेंबर महिना संपत आला की जगभरातील शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ब्लॅक फ्रायडे सेलची धूम सुरू होते. कुठे ५० टक्के, तर कुठे ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटची जाहिरात केली जाते. आकर्षक ऑफर्स, फ्लॅश सेल आणि मर्यादित वेळेच्या डील्स दाखवून ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. मात्र, यंदा या सगळ्या झगमगाटात Gen-Z ची भूमिका काहीशी वेगळी दिसत आहे. भरमसाठ खरेदी करण्याऐवजी तरुणाईने सोशल मीडियावर ‘नो-बाय चॅलेंज’ला पसंती दिली आहे. पण नेमकं हे चॅलेंज काय आहे आणि तरुणाईला ते इतकं का आवडतंय?

काय आहे हे ‘नो-बाय चॅलेंज’?

नाव ऐकून या चॅलेंजमध्ये कोणतीही खरेदी करायची नाही, असा समज होऊ शकतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येक खर्चावर बंदी घालणे असा नाही. उलट, आपल्या गरजा आणि हौस यांमधला फरक ओळखून विचारपूर्वक खर्च करण्याची ही एक पद्धत आहे. या चॅलेंजमध्ये ठरावीक कालावधीसाठी केवळ आवश्यक गोष्टींवरच पैसे खर्च करण्याचा नियम पाळला जातो. घरभाडे, किराणा, प्रवास, औषधे किंवा दैनंदिन गरजांसाठी खर्च करण्यास कोणतीही मनाई नसते. मात्र, कपाटात आधीच भरपूर कपडे असताना आणखी एक ड्रेस घेणे, केवळ ट्रेंडमध्ये आहे म्हणून महागडे शूज खरेदी करणे किंवा घरात जागा नसतानाही डेकोरेशनच्या वस्तू मागवणे टाळले जाते.

थोडक्यात, गरज नसलेल्या खरेदीला ब्रेक लावून बचतीला प्राधान्य देणे, हा या चॅलेंजचा मुख्य उद्देश आहे.

Gen-Z चा शॉपिंगकडे पाठ फिरवण्यामागे काय कारण?

आजच्या डिजिटल युगात खरेदी करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. एका क्लिकवर किंवा UPI स्कॅन करताच पैसे खर्च होतात. त्यामुळे छोट्या-छोट्या खरेदींचा एकत्रित परिणाम किती मोठा होतो, याचा अनेकदा अंदाजही येत नाही. महिन्याच्या सुरुवातीलाच ऑनलाइन शॉपिंग, बाहेरचे खाणे आणि वेगवेगळ्या गोष्टींवर पैसे खर्च होतात. मात्र, महिन्याचा मध्य येईपर्यंत बँक बॅलन्स कमी झालेला दिसतो. हीच जाणीव आता तरुणांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देत आहे.

महागाई वाढत असताना केवळ दिखाव्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी बचत करणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना Gen-Z मध्ये वाढताना दिसतेय.

फेक डिस्काउंट आणि मार्केटिंग तरुणाईचा नकार

ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये मोठमोठ्या डिस्काउंटच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, प्रत्येक ऑफर खरोखरच फायदेशीर असते का? हा प्रश्न आता ग्राहक विचारू लागले आहेत. काही ऑनलाइन सेलमध्ये उत्पादनांच्या किमती आधी वाढवून नंतर त्यावर मोठी सूट दिल्याचा आभास निर्माण केला जातो, अशी ग्राहकांची तक्रार असते. ‘फक्त दोनच वस्तू शिल्लक’, ‘ऑफर संपायला काही मिनिटे बाकी’ अशा संदेशांमधून ग्राहकांवर तातडीने खरेदी करण्याचा दबाव निर्माण केला जातो.

मात्र, सोशल मीडियामुळे आता किंमतींची तुलना करणे, रिव्ह्यू तपासणे आणि उत्पादनाचा आधीचा दर पाहणे सोपे झाले आहे. त्यामुळे केवळ डिस्काउंट दिसतोय म्हणून खरेदी करण्यापेक्षा खरोखर गरज आहे का, याचा विचार Gen-Z करू लागली आहे.

‘शॉपिंग हॉल’पेक्षा मिनिमलिझमला पसंती!

काही काळापूर्वी सोशल मीडियावर मोठमोठ्या शॉपिंग बॅग्स, कपड्यांचे ढीग आणि महागड्या वस्तू दाखवणारे ‘शॉपिंग हॉल’ व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, आता या ट्रेंडला पर्याय म्हणून मिनिमलिझम आणि साधेपणाला महत्त्व दिले जात आहे. अनेकदा कंटाळा, ताण किंवा मूड चांगला करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग केली जाते. ऑर्डर येईपर्यंत उत्सुकता असते; वस्तू हातात आल्यानंतर मात्र काही दिवसांतच त्यातील आकर्षण कमी होते. शेवटी घरात न वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा साठा आणि खर्च केल्याची खंत उरते.

हीच गोष्ट लक्षात घेऊन तरुणाई आता कमी वस्तू खरेदी करणे, उपलब्ध वस्तूंचा अधिकाधिक वापर करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे याला महत्त्व देत आहे. ‘Less is more’ अर्थात कमी वस्तूंमध्येही समाधान शोधण्याची ही मानसिकता सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नो-बाय चॅलेंज म्हणजे कंजूषपणा नव्हे, तर आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात!

एकूणच, ‘नो-बाय चॅलेंज’ हा केवळ काही दिवस खरेदी न करण्याचा ट्रेंड नाही. तर आपल्या खर्चाच्या सवयी समजून घेण्याची आणि पैशांबाबत अधिक जागरूक होण्याची ही एक संधी आहे.

ब्लॅक फ्रायडेच्या आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंटच्या दुनियेत Gen-Z चा हा बदलता दृष्टिकोन लक्षवेधी ठरत आहे. कारण आता तरुणाईसाठी स्टायलिश दिसण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अधिक महत्त्वाचे ठरू लागले आहे. शेवटी, प्रत्येक ऑफरचा फायदा घेण्यापेक्षा आपल्या गरजेनुसार खर्च करणे आणि भविष्यासाठी पैसे वाचवणे, हाच खरा स्मार्टनेस आहे\!

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?