गाडीत गाणं गुणगुणत होता आमिर खान, संगीतकाराने ऐकताच दिली ऑफर; पुढे इतिहास घडला

गाडीत सहज गुणगुणलेल्या एका गाण्यामुळे आमिरला गायनाची ऑफर मिळाली होती. मात्र, त्याने सुरुवातीला ही ऑफर गंमत म्हणून घेतली. पुढे स्वतःच्या आवाजाला शोभेल अशा गाण्याची अट घातली आणि एक भन्नाट गाणं तयार झालं. नेमका काय होता हा किस्सा?

गाडीत गाणं गुणगुणत होता आमिर खान, संगीतकाराने ऐकताच दिली ऑफर; पुढे इतिहास घडला
aamir khan populr song
Image Credit source: social media
| Updated on: Nov 12, 2026 | 11:32 PM

बॉलिवूडमध्ये काही कलाकार आपल्या अष्टपैलू अभिनयासोबतच काहीतरी हटके करून प्रेक्षकांना थक्क करतात. मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचं नाव यात आघाडीवर घ्यावं लागेल. साल १९९८ मध्ये आलेल्या ‘गुलाम’ चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ हे सुपरहिट गाणं आमिर खानने स्वतः गायलं होतं. विशेष म्हणजे आमिर व्यावसायिक गायक नव्हता, पण त्याने घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे या गाण्याचं रेकॉर्डिंग अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण झालं होतं. या भन्नाट गाण्यामागे एक रंजक किस्सा दडलेला आहे.

संगीतकार जोडी जतिन-ललित ‘गुलाम’ चित्रपटाच्या सेटवर जात असताना आमिर खान स्वतः गाडी चालवत होता. प्रवासात असताना आमिरने ‘सागर जैसी आँखों वाली’ हे गाणं सहजच गुणगुणायला सुरुवात केली. ललित पंडितने जेव्हा आमिरच्या आवाजातील सूर आणि पोत ऐकला, तेव्हा त्याला तो खूप आवडला. त्याने लगेच आमिरला चित्रपटासाठी एक गाणं गाण्याची ऑफर दिली.

Loading...

सुरुवातीला आमिरला हा सगळा प्रकार विनोद वाटला. “मी कुठे गाऊ शकतो?” असा सवाल त्याने केला. मात्र, ललित पंडितने त्याच्या आवाजातील वेगळेपण त्याला पटवून दिलं. आमिरनेही गाण्याच्या निवडीबाबत सावध भूमिका घेत स्वतःच्या आवाजाला शोभेल अशाच गाण्याची अट घातली.

आमिरच्या पात्राची ‘गुलाम’ चित्रपटातील शैली मुंबईतील टपोरी आणि स्ट्रीट-स्मार्ट अशी होती. त्यामुळे गाण्याचे बोलही तसेच असावेत, असं ठरलं. गीतकार नितीन रायकर यांनी “ऐ क्या बोलती तू” आणि “आती क्या खंडाला” ही लोकप्रिय शब्दांची रचना केली.

आमिर खानच्या शूटिंगचं वेळापत्रक खूप व्यस्त होतं. त्यामुळे तो दिवसभर काम करून रात्री उशिरा, अगदी मध्यरात्री सरावासाठी पोहोचायचा. जतिन-ललित यांच्या मार्गदर्शनाखाली रोज रात्री तब्बल ९० मिनिटे त्याचा कसून सराव चालायचा. विशेष म्हणजे, आपण एखादं गाणं रेकॉर्ड करतोय, याची साधी कानोकानी खबर त्याने आपल्या कुटुंबीयांनाही लागू दिली नव्हती.

या मध्यरात्रीच्या कष्टाचं फळ रेकॉर्डिंगच्या दिवशी दिसून आलं. आमिरने अत्यंत आत्मविश्वासाने संपूर्ण गाणं अवघ्या ३० मिनिटांत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये उरकलं. पुढे या गाण्याला आणि आमिरच्या अनोख्या गायकीला फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकनही मिळालं होतं.

गाणं तयार झालं असलं तरी आमिरचं समाधान झालं नव्हतं. गाण्याचं पहिलं चित्रीकरण पाहिल्यानंतर तो खूश नव्हता, त्यामुळे त्याने संपूर्ण गाणं पुन्हा शूट करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुसऱ्या प्रयत्नात हे गाणं अधिक दमदार बनलं आणि पडद्यावर इतिहास रचून गेलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us