रामायणाच्या स्पेशल इफेक्टची सर्वत्र चर्चा, परंतू ९० च्या दशकात महेश कोठारे यांनी बाटलीतला ‘गंगाराम’ कसा जीवंत केला ?
रामायण चित्रपटातील स्पेशल इफेक्ट सर्वत्र गाजत असताना ९० च्या दशकात जेव्हा हे तंत्रज्ञान कोणालाही माहिती नव्हते तेव्हा महेश कोठारे यांनी 'धडाकेबाज' चित्रपटातला बाटलीतला गंगाराम कसा जीवंत केला त्याची ही कहाणी...

रामायण चित्रपट नुकताच रिलीज झाला असून त्याच्या सीजीआय तंत्राची चर्चा सर्वत्र सुरु आहे. परंतू जेव्हा हे तंत्रज्ञान कोणाला माहिती नव्हते, तेव्हा ९० दशकात बाटलीतला ‘गंगाराम’ दाखवून महेश कोठारे यांनी सर्वांना थक्क केले होते. ‘धडाकेबाज’ चित्रपटासाठी दिग्दर्शक महेश कोठारे यांनी अनोखे तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी ते परदेशात शिकण्यासाठी गेले होते. त्यानंतर ‘धडाकेबाज’ चित्रपटातला बाटलीतला गंगाराम अक्षरश: जीवंत झाला होता. काय या मागची कहाणी जाणून घेऊयात.
‘रामायण’ चित्रपटाचे व्हीएफएक्सची जगभरात चर्चा आहे. अशा पद्धतीचे स्पेशल इफेक्ट यापूर्वी हिंदी चित्रपटात झाले नव्हते. अवतार इतर हॉलीवूड पटात असे स्पेशल इफेक्ट पाहायला मिळाले आहेत. मात्र, बॉलीवूड पटात इतके स्पेशल इफेक्ट पाहण्यात आले नव्हते. मात्र, मराठीत ‘धडाकेबाज’ चित्रपटात धाडसी आणि नेहमी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश कोठारे यांनी नवीन तंत्रज्ञान आणण्याचा चंग बांधला. हा गंगाराम बाटलीत दाखवण्यासाठी तंत्रज्ञान शिकायला महेश कोठारे थेट अमेरिकेत गेले होते. अमेरिकेतील ट्वेंटींथ सेंचुरी फॉक्स स्टुडिओत महेश कोठारे एक महीना हे तंत्रज्ञान शिकले.परंतू खरी परीक्षा शुटींगच्या वेळी निर्माण झाली. त्यावेळपर्यंत भारतात स्पेशल इफेक्ट करण्यासाठी बॅकग्राऊंड काळा पडदा वापरला जात होता. त्याचे इफेक्ट आणि दृश्ये खूप खराब आणि डल तसेच कमी दर्जाचे दिसत. उच्च दर्जाचे इफेक्ट हवे असतील तर ब्ल्यू स्क्रीनवर शुटींग करणे बंधनकारक होते आणि त्यासाठी विशेष रिळ लागायचे.
महेश कोठारे यांना या स्पेशल रिळचे २० बॉक्स हवे होते. मात्र, किमान १०० रिळ एकत्र मागवावे लागायचे. त्यामुळे अडचण निर्माण झाली. नेमके त्यावेळी अजूबा या चित्रपटाचे शुटींग सुरु होते. त्याचे दिग्दर्शक पिटर परेरा होते. त्यांनाही या रिळ लागणार होत्या. महेश कोठारे यांनी पीटर परेरा यांच्याशी संपर्क साधला.आणि आपण दोघे मिळून हे १०० रिळ मागवू मला केवळ २० रिळ द्या उर्वरित तुम्ही घ्या अशी विनंती त्यांच्याकडे केली. दिग्दर्शक पिटर परेरा तयार झाले. अखेर त्या रिळ भारतात आल्या. त्यातून अखेर आपला लाडका बाटलीतला गंगाराम ‘धडाकेबाज’ चित्रपटातून पडद्यावर अवतरला. मराठीतल्या प्रेक्षकांना आपल्या आगळ्या वेगळ्या तंत्रातून एकशे बढकर एक चित्रपट देणाऱ्या महेश कोठारे यांनी पुढे अनेक चित्रपट काढले.
