Aamir Khan: मुलाखतीदरम्यान आमिरला कोसळलं रडू; म्हणाला “अब्बाजानला पाहून..”

| Updated on: Dec 04, 2022 | 9:55 AM

संघर्षाचे दिवस आठवून आमिर खान भावूक; भर मुलाखतीत अश्रू अनावर

Aamir Khan: मुलाखतीदरम्यान आमिरला कोसळलं रडू; म्हणाला अब्बाजानला पाहून..
Aamir Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र यादरम्यान तो निर्माता म्हणून काम करत राहणार आहे. सतत चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, अशी खंत त्याने काही मुलाखतींमध्ये बोलून दाखवली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांविषयी बोलताना तो भावूक झाला. आमिरचे वडील ताहिर हुसैन हे चित्रपट निर्माते होते. त्यामुळे आमिर लहानपणापासूनच आलिशान जीवन जगला, असा अनेकांचा गैरसमज झाला. याविषयी तो या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत आमिरने त्याच्या बालपणीच्या दिवसांतील काही आठवणी सांगितल्या. आमिर दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी एका चित्रपटासाठी व्याजावर कर्ज घेतलं होतं. मात्र तो चित्रपट तब्बल आठ वर्षे रखडला होता. तेव्हाचा काळ आठवून आमिर भावूक झाला आणि यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू आले.

हे सुद्धा वाचा

वडिलांविषयी आमिर म्हणाला, “अब्बाजानला पाहून आम्हाला खूप वाईट वाटायचं. कारण ते खूप साध्या मनाचे होते. एवढं कर्ज घ्यायला पाहिजे नव्हतं हे कदाचित त्यांना त्यावेळी समजलं नव्हतं. त्यांना संघर्ष करताना पाहून खूप त्रास व्हायचा. ज्यांच्याकडून कर्ज घेतलं, त्यांचे सतत फोन त्यांना यायचे. मी काय करू, माझ्याकडे पैसेच नाहीत, माझा चित्रपट अडकला आहे असं ते म्हणायचे.”

असं असतानाही वडिलांनी सर्वांचे पैसे परत केल्याचं त्याने सांगितलं. “मला आजही आठवतंय, जेव्हा महेश भट्ट यांनीही आशा सोडून दिली होती, पण पैसे परत मिळाल्यावर ते खूप थक्क झाले होते”, असं तो पुढे म्हणाला.

“घराची परिस्थिती अशी असूनही वडिलांनी माझ्या शाळेची फी वेळेवर भरली होती. आमच्यासाठी ते आईला थोडे मोठे पँट विकत घ्यायला सांगायचे. जेणेकरून आम्ही ते अधिक काळासाठी वापरू शकू,” असंही आमिरने सांगितलं.