
काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एआय (AI) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतनेच हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी आणि अभिजीतचा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता त्या व्हिडिओमागचं खरं कारण समोर आलं आहे. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांना मोहीत करणारा अभिजीत सावंत लवकरच अजून एका नव्या गाण्यामधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात गाण्याचा ट्विस्ट म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील देखील अभिजीतसोबत यात काम करताना दिसणार आहे.
2025 वर्षात अभिजीतने अनेक ट्रेंडिंग गाणी गायली आणि प्रेक्षकांना मोहीत केलं. ‘चाल तुरु तुरू’पासून नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘आय पॉपस्टार’मधलं ‘मोहब्बते लुटाऊंगा’चं नवंकोरं जेन-झी व्हर्जन असो.. अभिजीतने त्याच्या सुमधूर आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आता त्याचं ‘रुपेरी वाळूत’ हे नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात त्याच्यासोबत गौतमी पाटील देखील वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. येत्या 5 डिसेंबरला हे गाणं प्रदर्शित होणार असून आता हे गाणं जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट असणार की अजून काही हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अभिजीत आणि गौतमी यांचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पाहून आधीच चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली होती. त्यानंतर आता ‘रुपेरी वाळूत’ हे नाव ऐकल्यानंतर ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात..’ हे जुनं गाणं तुफान गाजलं होतं. त्यामुळे त्याचं हे नवीन व्हर्जन असेल की आणखी काही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नृत्यांगना गौतमी पाटीलचा एकही कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला नाही असं होत नाही. त्याचप्रमाणे वाद आणि गौतमी पाटील हेसुद्धा जणू एक समीकरणच बनलं आहे. कधी तिच्या कार्यक्रमात राडे होताना दिसतात, तर कधी पोलीस संरक्षण पुरवू न शकल्याने कार्यक्रम रद्द झाल्याच्याही बातम्या असतात. स्टेज शो करत असतानाच गौतमी काही मराठी चित्रपटांच्या गाण्यांमध्येही झळकली आहे. आता अभिजीतसोबत तिचा हा अल्बम चर्चेत आला आहे.