
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता फिल्म इंडस्ट्री किंवा चाहत्यांसाठीही काही नवीन नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेकदा या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु त्यावर दोघांनी कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचसोबत सोशल मीडियाचा वापर कमी केल्याबद्दलही त्याने खुलासा केला.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “होय, मी सोशल मीडियाचा वापर खूप कमी केला आहे. जर तुम्हाला गरमी सहन होत नसेल तर स्वयंपाकघरातून आधी बाहेर पडा. सोशल मीडियाचा बहुतांश भाग तुम्हाला भडकावण्याचंच काम करतो. इथे तुम्ही चांगली चर्चा करूच शकत नाही. जेव्हा सोशल मीडिया अस्तित्वात आला, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता तसं होत नाही. आता मी त्याचा वापर फक्त कामापुरता करतो.”
सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ट्रोलिंगचा किंवा फेक न्यूजचा तुझ्यावर काही परिणाम होतो का, असाही प्रश्न अभिषेकला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तो पुढे म्हणाला, “जी व्यक्ती चुकीच्या सूचना किंवा खोटी माहिती पसरवते, त्या व्यक्तीला स्पष्टीकरण किंवा चूक सुधारण्यात कोणताच रस नसतो. माझ्याबद्दल ज्या गोष्टी आधी बोलल्या जायच्या, त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. परंतु आज माझं एक कुटुंब आहे. जरी मी काहीही स्पष्ट केलं, तरी त्याचा अर्थ चुकीचा काढला जाणार. कारण नकारात्मक बातम्या सर्वाधिक विकल्या जातात. परंतु सत्य हेच आहे की तुम्ही ‘मी’ नाही आहात.”
“तुम्ही माझं आयुष्य जगत नाही. त्यामुळे मी त्या लोकांना स्पष्टीकरण किंवा कोणतंही उत्तर देण्यासाठी बांधिल नाही. जे लोक अशी नकारात्मकता पसरवतात, त्यांना आपल्या अंतरात्मासोबत जगायचं आहे. त्यांना त्यांच्या अंतरात्माचा सामना करावा लागेल, उत्तर द्यावं लागेल. हे फक्त माझ्यापुरतं नाही, मी त्या गोष्टीने प्रभावित होत नाही”, अशा शब्दांत अभिषेक व्यक्त झाला.
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या ‘कालीधर लापता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या 4 जुलै रोजी हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. याशिवाय 30 जून रोजी नुकतेच त्याने फिल्म इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिषेक त्याच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो.