
दोन दिवसांच्या पाठलागानंतर अखेर गाझियाबाद पोलिसांनी हरियाणवी चित्रपट निर्माता आणि अभिनेता उत्तर कुमार याला अटक केली. एका अभिनेत्रीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला पोलिसांनी उत्तरला क्लीन चिट दिली होती. परंतु जेव्हा पीडित अभिनेत्रीने लखनौमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा तपास सुरू करण्यात आला. यावेळी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने हे प्रकरण हाती घेत आरोपीचा छडा लावला. विशेष म्हणजे हा ड्रामा इथेच संपला नाही. तर ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्याने पोलिसांना धमकावलं की त्याने विषारी पदार्थ प्राशन केलं आहे. त्यानंतर त्याला 24 तासांपेक्षा अधिक काळ एका रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात आलं होतं. तेव्हा उत्तर कुमारची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी पोलीस आयुक्तालयात निदर्शनंही केली.
गाझियाबादच्या शालीमार गार्डन पोलिसांनी उत्तर कुमारला अमरोहा इथून ताब्यात घेतलं. परंतु ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक होईपर्यंत बराच बराच नाट्यमय प्रकार घडला. उत्तरला 15 सप्टेंबर रोजी पहाटे उत्तर प्रदेशातील अमरोहा इथून ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हा त्याने विषारी पदार्थ प्राशन केल्याचं सांगून पोलिसांना घाबरवलं. अखेर पोलिसांनी ताबडतोब त्याला एका रुग्णालयात दाखल केलं. जिथे 16 सप्टेंबरच्या दुपारपर्यंत सर्व चाचण्या झाल्या. त्यानंतर उत्तर कुमारला पोलिसांनी अटक केली.
उत्तर कुमारच्या पत्नीने, कुटुंबीयांनी आणि त्याच्या जवळच्या मित्रांनी पोलीस आयुक्तालयात निदर्शनंही केली. पीडितेनं आत्मदहनाची धमकी दिली, त्यामुळेच पोलिसांनी घाबरून उत्तर कुमारला अटक केल्याचा आरोप त्यांनी केला. महिलेच्या सुरुवातीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा जेव्हा उत्तर कुमारला बोलावलं, तेव्हा तो पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली होती आणि या प्रकरणात अंतिम अहवालदेखील दाखल केला होता. परंतु पीडित महिलेनं जेव्हा आत्मदहनाची धमकी दिली, तेव्हा पोलीस अधिकारी बदलण्यात आला आणि नंतर उत्तरला अमरोहा इथून ताब्यात घेण्यात आलं.
उत्तरच्या बाजूने निदर्शने करण्यासाठी आलेल्या लोकांनी पीडित महिलेवर आरोप केला आहे. तिने उत्तरकडे तीन कोटी रुपये मागितले होते. हे पैसे न दिल्यानेच तिने असे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान उत्तर कुमारला न्यायालयात हजर केलं असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.