
Rekha Vs Jaya Bachchan : अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) आणि फोटोग्राफर्स यांचं फारसं सख्य नाही हे आता अख्ख्या जगाला माहीत आहे. बहुतांश वेळेला सर्वांशी फटकून वागणाऱ्या जया बच्चन या बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात. त्यांचं वागणं, बोलणं , समोरच्याला फटकारणं, पापाराझींवर भडकणं, एवढंच नव्हे तर पापाराझींबद्दल, त्यांच्या कपड्यांबद्दल त्यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य यावरून त्यांना टीकेचाही सामना करावा लागला आहे. एवढंच नव्हे तर फोटोग्राफर्सनी त्यांला बॉयकॉट करण्याचाही इशारा दिला होता. त्यांचं वागणं चर्चेत असतानाचा दुसरीकडे अभिनेत्री रेखा (Rekha) या मात्र मोकळेपणाने वागताना दिसतात. पापाराझींसमोर त्या खुलेपणाने पोझही देतात, छान बोलतात. अलिकडेच, लेखिका शोभा डे यांनी या दोन्ही अभिनेत्रींची तुलना करत त्या दोघींबद्दल सांगितलं. रेखा या जया बच्चनइतकी “कंटाळवाणी” नाहीये आणि ती पापाराझींना हुशारीने हाताळते असंही विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ माजली आहे.
विक्की लालवाणी याच्याशी एका मुलाखतीत बोलताना शोभा डे या रेखा आणि जया बच्चन यांच्याबद्दल बोलल्या. “रेखा कधीच कंटाळवाणी (बोरिंग) नसते, म्हणून मला तिचं प्रत्येक रील पहायला आवडतं. पापाराझींसाठी ती काय करते हे पाहणं मला आवडतं. ती जया बच्चनसारखी नाही, ती (रेखा) पापाराझींना मोहित करण्याचा प्रयत्न करते. दोघींमधला फरक मला खूप महत्वाचा वाटतो. रेखाचा प्रत्येक पैलू कृत्रिम आहे आणि मला तो आवडतो कारण ती ती भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेते.” असं मत शोभा डे यांनी व्यक्त केलं.
रेखा बनणं सोपं नाही
शोभा डे पुढे म्हणाल्या, ‘रेखा बनणं सोपं नाही. तिला जे हवं ते ती बनू शकते, ती अमिताभ बच्चन बनू शकते. जेंडर चेंज करू शकते. ती इतकी प्रतिभावान आहे’ असं त्यांनी नमूद केलं. “रेखा अजूनही खूप वैविध्यपूर्ण आहे. तिला तुम्हाला कोणती रेखा दाखवायची आहे, त्यावर ते अवलंबून आहे आणि हेच तिला इतकं मनोरंजक बनवतं. तिला जे पाहिजे ते ती बनू शकते. कारण ती खूप बुद्धिमान , संवदेनशील आणि तेवढीच प्रिभावान, टॅलेंटेड आहे. ती एक असाधारण महिला आहे. तिला तिच्या ताकदीची जाणीव आहे” असंही शोभा डे म्हणाल्या.
‘तिचं गूढ व्यक्तिमत्व हेच रेखाची सर्वात मोठी ताकद ‘
रेखाबद्दल शोभा आणखीही बोलल्या, त्या म्हणाल्या की – ‘ (रेखाचं) तिचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे, तिचं गूढ, रहस्यमयी व्यक्तिमत्व आहे. जर तिने हे रहस्य कमी करण्याचा प्रयत्न केला तर ती सध्या धोकादायक मार्गावर चालत आहे. तिच्याबद्दल वाटणारं गूढ संपलं तर मग तिच्याकडे काहीच उरणार नाही. गेल्या 10-15 वर्षांपासून तिच्याकडे असे कोणतेही काम नाही की, की ती ते पुन्हा पुन्हा करू शकेल. माझ्याकडे खूप काम आहे म्हणून काही फरक पडत नाही असंही ती म्हणू शकणार नाही. आता तिच्याबद्दल वाटणारं फक्त गूढ उरलं आहे. आणि जर ते गूढ संपलं तर काहीच उरणार नाही.’ असंही शोभा डे म्हणाल्या.